एक दिवसाच्या कस्टडीत इक्बाल कासकरची NCBकडून 7 तास चौकशी; ड्रग्स आणि टेरर फंडिंगबाबत महत्त्वाचे खुलासे आले समोर.!
अरुण पाटील, भिवंडी, दिं.26 :
एनसीबीनं (NCB) अलीकडेच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची कस्टडी घेऊन ड्रग्स आणि टेरर फंडिंग प्रकरणाची चौकशी केली आहे. त्याचबरोबर अमली पदार्थांच्या पुरवठ्या संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. काल (दिं.25 ) रोजी भिवंडी न्यायालयाने एक दिवसाची कस्टडी सुनावली असून NCBने इक्बाल कासकरची तब्बल 7 तास चौकशी केली. या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आली आहे. यावेळी इक्बाल कासकरला भारत आणि पाकिस्तान सीमेचा नकाशा दाखवून अनंतनाग मार्गे सीमा ओलांडून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या मार्गाबाबतही विचारणा करण्यात आली आहे.
यावेळी एनसीबीनं शब्बीर उस्मान शेख आणि इक्बाल कासकर यांची समोरासमोर चौकशी केली. शब्बीर उस्मान शेख हा जम्मू-काश्मीरमार्गे सीमेपलीकडून चरस तस्करीतील मुख्य आरोपी आहे. एनसीबीच्या मते, अटक केलेला आरोपी शब्बीर शेख हा इक्बाल कासकरचा जुना मित्र आहे. इक्बाल कासकरला 2003 मध्ये दुबईहून भारतात हद्दपार करण्यात आलं होतं. त्यावेळी शब्बीर हा इक्बाल कासकरसोबत डी-कंपनीच्या खंडणी व ड्रग्स व्यावसायात सक्रिय होता. त्यावेळी शब्बीर हा कासकरचा खास माणूस होता.त्याच बरोबर, 2015 मध्ये इक्बाल कासकर आणि शब्बीर शेख यांनी एका रिअल इस्टेट एजंटला 3 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पण त्यानं पैसे न दिल्यानं दोघांनी संबंधित एजंटला बेदम मारहाण केली होती. ज्यामुळे दोघांना अटकही करण्यात आली होती. पण नंतरच्या काळात डी-कंपनीकडून शब्बीरला केवळ ड्रग्सचा व्यवसाय करण्याची जबाबदारी देण्यात आली.
यानंतर शब्बीर दर महिन्याला 15 ते 20 किलो चरस मुंबईत छुप्प्या मार्गानं आणत होता. म्हणजेच एकटा शब्बीर दरमहा 10 कोटी रुपये ड्रग्समधून कमावत होता. याप्रकरणाची चौकशी सुरू असताना शब्बीरनं आपण इक्बाल कासकरसाठी काम असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारेच एनसीबीनं मकोका कोर्टाकडे कासकरची कस्टडी मागितली होती. सध्या NCB इक्बाल कासकर आणि शब्बीर यांच्या एकत्रित चौकशी करत आहे. त्यामुळे ड्रग्स आणि अंडरवर्ल्डशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment