Saturday 30 October 2021

ऐन दिवाळीत पाणी टंचाईचा, 'शिमगा'? विजबील थकबाकी, जिर्णजुनाट पाईपलाईन, भ्रष्टाचार कारणीभूत !!

ऐन दिवाळीत पाणी टंचाईचा, 'शिमगा'? विजबील थकबाकी, जिर्णजुनाट पाईपलाईन, भ्रष्टाचार कारणीभूत !!


कल्याण, (संजय कांबळे) : सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोकणात अर्थात ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत हद्दीतील गावात तसेच महानगरपालिका क्षेत्रात ऐन दिवाळीच्या सणात पाणी टंचाई विरोधात'शिमगा'सुरू असून अजून मार्च, एप्रिल मे लांबच आहेत, तोपर्यंत अशी अवस्था तर उन्हाळ्यात कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागे विजबील थकबाकी, जिर्णजुनाट पाईपलाईन आणि योजनेतील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.


ठाणे जिल्ह्यातील, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ आणि ठाणे तालुक्यात १२ प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत, यामध्ये, कल्याणात,रायते प्रादेशिक नळ पाणी पुरवठा, मुरबाड मध्ये टोकावडे योजना, शहापूरात,अधई, बिरवाडी, कळंबे,आणि ठिले शेंंद्रूण तर भिवंडीत ३ योजना आहेत, बाकी इतर बहुतांश योजना या त्या त्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. यांच्या जोडीला बोअरवेल, विंधन विहीर, आहेच, असे असूनही पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडून देखील उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळत नाही ही शोकांतिका आहे. यामागील कारणे ही मानवनिर्मित आहेत, पाणी योजनांची वर्षानुवर्षेची विजबील थकबाकी लाखोंच्या घरात आहे, विद्यूत कंपनी थकीत बीलापोटी पाणी योजनाची लाईट कट करतात, मग गावाची पाणीटंचाई सुरू.


केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर विद्यूत मंडळाच्या गोवेली सेक्शन अतंर्गत तब्बल ५७ गावातील थकबाकी आहे, खडवली सेक्शन मध्ये १६ गावे, तसेच खडवली २ सेक्शन ७ गावे अशी थकबाकी हजारो, लाखोंच्या घरात आहे. हे झाले थकबाकीचे? आता पाणी योजनाचा विचार केला तर अनेक योजना १५/२० वर्षे पुर्वीच्या जिर्णजुनाट आहेत, काही योजना तर केवळ कागदावरच दिसतात, या योजनेचे पाईप हे अनेकांच्या घरासमोरील शेड, गोटे, येथे जाऊन लटकलेले दिसतात. काही पाईप हे भंगारवाल्याच्या गोडाऊन मध्ये दिमाखात उभे आहेत. कोण विच्चारतो, सगळेच एका माळेचे मणी?


भ्रष्टाचाराचा विचार केला तर, पैसा पाण्यात कसा मुरतो हे या पाणी योजनामधून दिसून येईल. प्रत्येक वर्षी  प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा बनवला जातो, यामध्ये विविध पाणी योजनावर लाखो, करोडो रुपये याची तरतूद केली जाते, प्रत्येक वर्षी नवनवीन योजना, दुरुस्ती, देखभाल केली जाते, ऐवढे करून ही प्रत्येक वर्षी पाणी टंचाई आहेच?एकट्या शहापूर तालुक्यात २५ टँकर ने पाणी पुरवठा करावा लागतो. सर्वाधिक निधी, तसेच पेसा अंतर्गत पैसा देखील याच तालुक्याला मिळतो. पण पाणी टंचाई काय केल्याने दूर होत नाही, ही खरी 'जादू' आहे. याचा अर्थ इतर तालुक्यात सर्व काही अलबेल आहे असे मुळीच नाही, फक्त त्याचे प्रमाण कमी अधिक आहे.

कल्याण तालुक्यातील वडवली शिरढोण गावात गेल्या २ वर्षापासून पाणी टंचाई सुरू होती, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी ने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. कांबा, गावातील महिलांनी पाणी प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले होते, रायते, गोवेली, घोटसई, निंबवली, सांगोडे, कोंढेरी, चौरे, रोहन, कोलम केळणी, आपटी मांजर्ली, गुरवली, उशीद, पळसोली, आदी गावात कमी अधिक प्रमाणात पाणी प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व परिस्थिती त बदल व्हायला हवा, यासाठी गावातील महिला बचतगट, तरुण मंडळी, सकारात्मकता असणारे लोक यांनी पाण्याच्या विषयी राजकारण करणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्याना तांदळातील खड्याप्रमाणे दूर करायला हवे,अन्यथा दिवाळीच काय? प्रत्येक सणाला पाण्यासाठी "शिमगा" करावा लागेल! 

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...