भिवंडीत कोळशाचा ट्रक मजुराच्या झोपडीवर उलटल्याने तीन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू !!
भिवंडी, दिं,27, अरुण पाटील (कोपर) :
आदिवासी वीटभट्टी मजुरांच्या परिवारावर काळाने घात घातला असून असून वीटभट्टीच्या बाजूला बनविलेल्या गवताच्या झोपडीत झोपलेल्या मुलींच्या अंगावर कोळशाने भरलेला ट्रक उलटल्याने झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना सायंकाळी टेंभिवली गावात घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून या घटनेला जबाबदार धरुण वीटभट्टी मालकांबरोबरच ट्रक चालकासह चौघांवर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीटभट्टी व्यवसायाला लागणारा दगडी कोळसा हायड्रॉलीक हायवा ट्रक (डंपर) मधून खाली केला जात असताना ट्रकच्या मागील बाजूच्या ट्रॉलीचा कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने संपूर्ण मागील ट्रॉली कोळशासह वीटभट्टी मजुराच्या गवताच्या झोपडीवर पडल्याने झालेल्या अपघातात आदिवासी मजुराच्या झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्यां मुलींचा कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दाबल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत बाळाराम कान्हा वळवी या आदिवासी वीटभट्टी मजुराच्या लावण्या वय ७ वर्ष, अमिषा वय ६ वर्ष आणि प्रीती वय ३ वर्ष या तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघातामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने इतर कामगार त्या ठिकाणी धावून येत कोळशाच्या ढिगा-या खालुन सर्वांना बाहेर काढले परंतु तो पर्यंत या चिमुरडींचा जीव गेला होता. भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथील मोहिली येथील बाळाराम वळवी हा आपल्या पत्नी व चार मुलींसह वीटभट्टी मजुरी साठी आपल्या मुळगावाहून स्थलांतरीत होऊन भिवंडी तालुक्यातील टेंभिवली या गावात गोपीनाथ मढवी व त्यांचा मुलगा महेंद्र मढवी यांच्या वीटभट्टी वर मजुरी साठी आले आहेत .
वीटभट्टी परिसरतच गवताच्या झोपडीत हे मजूर कुटुंब राहात होते .त्याच्या झोपडी लगतच्या मोकळ्या जागेत वीटभट्टी पेटविण्यास लागणारा दगडी कोळसा साठविला जात असे. नेहमी प्रमाणे कोळसा घेऊन आलेला भलामोठा हायड्रोलीक हायवा ट्रक खाली करण्यासाठी मागील बाजू कडील ट्रॉली उचलली असता त्याखालील कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने ट्रॉली मधील कोळशासह ट्रॉली बाळाराम वळवी याच्या झोपडीवर पडल्याने झोपडीत एका कोपऱ्यात जमिनीवर झोपलेल्या तिघी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने बाहेर गेलेले बाळाराम व झोपडी बाहेर चुलीवर जेवण करणारी पत्नी व झोळीत झोपलेली दोन वर्षांची कीर्ती हे तिघे जण या अपघातातून बचावले आहेत.
या दुर्घटने नंतर भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वीटभट्टी मजुराच्या फिर्यादी वरून वीटभट्टी मालक गोपीनाथ मढवी, मुलगा महेंद्र मढवी, व्यवस्थापक सुरेश रामदास पाटील, ट्रक चालक तौफिक शेख या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी गोपीनाथ मढवी व व्यवस्थापक सुरेश पाटील यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता २९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली असून दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
No comments:
Post a Comment