Monday, 31 January 2022

कल्याण बस आगारातील एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून राशन किटचे वाटप !! "कल्याण बस आगारातील १३० कर्मचाऱ्यांना जिजाऊ संस्थेचा एक हात मदतीचा"

कल्याण बस आगारातील एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून राशन किटचे वाटप !!

"कल्याण बस आगारातील १३० कर्मचाऱ्यांना जिजाऊ संस्थेचा एक हात मदतीचा"


कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण बस आगारातील एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून राशन कीटचे सोमवारी वाटप करण्यात आले. 


राज्यातील एसटी महामंडळाचे ९५ हजार कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून संपावर आहेत. एस. टी. महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणी करिता राज्यातील सर्वच आगारातील कर्मचारी आंदोलन करीत आहेत. 


राज्य सरकार तसेच राज्य परिवहन मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. संपावर सरकारकडून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्याने कामगारांचा प्रश्न अखेर न्यायालयात प्रलंबित आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना सरकार बेकायदेशीरपणे नोटिसा काढून कामगारांवर निलंबनाची कारवाई करीत आहे अनेक कामगारांवर निलंबनाची सरकारने कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यापासून कामगारांना मासिक वेतन मिळाले नाही कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून ८० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी उपासमारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. 


कामगारांची व्यथा समजून कामगारांना एक मदतीचा हात मिळावा म्हणून जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भाऊ सांबरे यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांना महिनाभर पुरेल इतके किराणा सामान वाटप  करण्याचा निर्णय घेतला आहे याचाच भाग म्हणून ठाणे पालघर भिवंडी येथील संपकरी कर्मचाऱ्यांना रेशन किटचे वाटप केले असून सोमवारी कल्याण बस आगारातील १३० कर्मचाऱ्यांना जिजाऊ सामाजिक संस्थेचे जिल्हा प्रमुख अजित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन किटचे वाटप करण्यात आले. 


यावेळी डीजे ग्रुप कल्याण शहर प्रमुख रोहित जाधव मनसे माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे, समाज सेवक आकाश सावंत समाज सेवक फिरोज शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील रोकडे आर्किटेक्ट गणेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. 


उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित करताना जिल्हाप्रमुख अजित जाधव म्हणाले की जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भाऊ सांबरे यांच्या मातोश्री भावना देवी सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील बस आगारातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून संस्थेकडून *एक हात मदतीचा एक हात जिजाऊचा* यानुसार आत्तापर्यंत *२५००* कर्मचाऱ्यांना रेशन किटचे वाटप करण्यात आले आहे. निलेश सांबरे यांचे वडील एसटी कर्मचारी होते एसटी कामगारांच्या काय समस्या असतात या निलेश भाऊ सांबरे यांनी जवळून पाहिल्या आहेत. तुटपुंज्या पगारावर काटकसर करून कुटुंब चालवावे लागते हे निलेश सांबरे यांनी जवळून पाहिले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना सुरुवातीलाच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने पाठिंबा दिला असून संपकरी कर्मचार्‍यांच्या बाजूने संस्था कायम खंबीरपणे उभे राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख अजित जाधव यांनी सांगितले. 

उपस्थित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी जिजाऊ सामाजिक संस्थेने केलेल्या मदतीने आम्ही भारावून गेलो असून संस्था आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भाऊ सांबरे यांनी आमच्या घरातील विझलेली चूल सुरू करून दिली आहे असे मत येथील एसटी कर्मचार्‍याने भावुक होऊन व्यक्त केले त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी जिजाऊ सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी जिजाऊ सामाजिक संस्थेचे कल्याण तालुकाप्रमुख आरती पाटील संदीप शेंडगे कुशल मोरे रिजवान सय्यद साहिल मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न !

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न ! विरार, पंकज चव्हाण : विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत...