पक्षाचे २३वे ठाणे-पालघर जिल्हा अधिवेशन तलासरीत उत्साहात संपन्न !!
पालघर, बातमीदार : १ मार्च ह्या कॉ. आर. बी. मोरे यांच्या जयंतीदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३ व्या ठाणे-पालघर जिल्हा अधिवेशनाची सुरुवात कॉ. गोदावरी शामराव परुळेकर भवन, तलासरी येथे झाली. या अधिवेशनाला १० तालुक्यांतून २६६ प्रतिनिधी हजर होते. महाराष्ट्रात यंदाच्या जिल्हा अधिवेशनांच्या मालिकेतील हे अखेरचे अधिवेशन होते.
९४ वर्षे वयाचे ज्येष्ठ पक्षनेते एल. बी. धनगर यांनी ध्वजारोहण केले. ८४ वर्षे वयाचे ज्येष्ठ पक्षनेते लहानू कोम यांनी हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली.
रामू पागी, रडका कलांगडा, सुनीता शिंगडा, ताई बेंदर, चंदू धांगडा व भरत वळंबा यांचे अध्यक्षमंडळ व मिनिट्स, क्रेडेन्शियल व ठराव समित्यांची निवड झाल्यावर शोकठराव भरत वळंबा यांनी मांडला.
अधिवेशनाचे उदघाटन पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. उदय नारकर यांनी केले. सद्य राजकीय आव्हानांचे त्यांनी प्रभावी विश्लेषण केले.
जिल्हा सचिव बारक्या मांगात यांची प्रकृती बरी नसतानाही ते अधिवेशनासाठी हजर होते, पण त्यांच्यातर्फे जिल्हा कमिटीचा ७२ पानी छापील अहवाल आमदार विनोद निकोले, लक्ष्मण डोंबरे व किरण गहला यांनी अधिवेशनासमोर मांडला.
दुपारी राज्य सचिवमंडळ सदस्य डॉ. अजित नवले यांनी देशातील व राज्यातील अभूतपूर्व शेतकरी आंदोलनाचे विश्लेषण करून पुढील कार्याची दिशा प्रेरणादायक रीतीने मांडली.
केंद्रीय कमिटी सदस्य मरियम ढवळे यांनी अहवालावरील चर्चेत काय मुद्दे अभिप्रेत आहेत हे उदाहरणांसहित समजावून सांगितले.
त्यानंतर अहवालावर तालुकानिहाय गटचर्चा झाली आणि सायंकाळी अहवालावर चर्चा सुरू झाली. चर्चेसाठी चार तास दिले होते.
२ मार्च रोजी सकाळी अहवालावरील चर्चा पूर्ण झाली. एकूण ३८ प्रतिनिधींनी त्यात उत्तम सहभाग घेतला. आमदार विनोद निकोले यांनी चर्चेला समर्पक उत्तर दिल्यावर अहवाल एकमताने मंजूर झाला.
प्राचार्य बी. ए. राजपूत आणि प्रा. संदीप वावरे यांनी जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर तसेच राजकीय आव्हानांवर ठराव मांडले, ते एकमताने मंजूर झाले.
क्रेडेन्शियल कमिटीने रात्री ३ वाजेपर्यंत जागून २६६ प्रतिनिधींच्या माहितीचा तयार केलेला अहवाल भास्कर म्हसे यांनी मांडला.
पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर आणि राज्य सचिवमंडळ सदस्य किसन गुजर यांनी अधिवेशनास संबोधित केले.
जिल्हा अधिवेशनाने नवीन जिल्हा कमिटी आणि राज्य अधिवेशनासाठी प्रतिनिधी निवडले. नवीन जिल्हा कमिटीच्या पहिल्या बैठकीत बारक्या मांगात यांच्या सूचनेनुसार, नवीन जिल्हा सचिव म्हणून किरण गहला यांची एकमताने निवड झाली. तसेच बारक्या मांगात, किरण गहला, आ. विनोद निकोले, लक्ष्मण डोंबरे, रामू पागी, नंदकुमार हाडळ, सुनीता शिंगडा, रडका कलांगडा, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखाना, चंद्रकांत वरठा, यशवंत घाटाळ, चंदू धांगडा, भरत वळंबा, सुनील सुर्वे, प्राची हातिवलेकर व पी. के. लाली यांच्या नवीन जिल्हा सचिवमंडळाची जिल्हा कमिटीने एकमताने निवड केली.
पक्षाचे ज्येष्ठ नेते एल. बी. धनगर, गेली ८ वर्षे पक्षाच्या जिल्हा सचिवपदाची धुरा अत्यंत समर्थपणे पेलणारे बारक्या मांगात आणि नवीन जिल्हा सचिव किरण गहला यांचा सत्कार अनुक्रमे उदय नारकर, मरियम ढवळे आणि किसन गुजर यांनी टाळ्यांच्या आणि घोषणांच्या गजरात केला.
तलासरी नगर पंचायतीवर स्वीकृत सदस्य म्हणून त्याच दिवशी निवड झालेले पक्षाचे कार्यकर्ते सुहास सुरती यांचा सत्कार विजय पाटील यांनी केला.
केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी समारोपाच्या भाषणात या अधिवेशनाच्या यशाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले, बारक्या मांगात यांच्या गेल्या चार दशकांतील लढाऊ व निष्ठावंत कार्याचा गौरव केला आणि जिल्ह्यातील कार्याची पुढील दिशा मांडली.
आंतरराष्ट्रीय गीताने आणि गगनभेदी क्रांतिकारक घोषणांनी या जिल्हा अधिवेशनाची सांगता झाली.
तलासरी तालुका सचिव लक्ष्मण डोंबरे आणि तलासरीतील इतर प्रमुख कॉम्रेडसनी या जिल्हा अधिवेशनाची उत्तम व्यवस्था ठेवली होती.






No comments:
Post a Comment