Wednesday, 9 March 2022

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने काढलेल्या मोर्चात फडणवीसाना अटक व सुटका !!

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने काढलेल्या मोर्चात फडणवीसाना अटक व सुटका !!


भिवंडी, दिं,९, अरुण पाटील (कोपर) :
         राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उचलून धरली होती. त्यासाठीच हा मोर्चा भाजपाने आज (दिं,९) रोजी मुंबईमधील आजाद मैदानामध्ये आयोजित केला होता. या धडक मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र आंदोलक शांत झाल्यानंतर फडणवीस यांना काही वेळाने सोडून देण्यात आले.
         फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढला होता.
         नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा विषय राज्यातील राजकारणामधील संघर्षाचा मुद्दा झालाय. भाजपाकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यावेळी दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत ही मागणी फेटाळून लावली.
          आजाद मैदानामधून मेट्रो सिनेमा मार्गे हा मोर्चा विधानभवनाकडे जाण्यास निघाला असता पोलिसांनी मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या फडणवीस यांची वाट अडवून त्यांना ताब्यात घेतलं. फडणवीस हे पोलिसांच्या व्हॅनमध्ये चढले. त्यापाठोपाठ भाजपाचे अन्य नेते ज्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार आणि अन्य नेतेही व्हॅनमध्ये चढले. काही वेळानंतर या सर्व नेत्यांना पोलिसांनी सोडून दिलं.
        देवेंद्र फडणविसांनी सांगितले की,काल. मंगळवार (दिं,८) रोजी मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई सहपोलीस आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्यांनी केलेली विनंती. मुंबईमध्ये बारावीच्या परीक्षा असल्याने भायखळ्या पासून आजाद मैदानापर्यंत मोर्चा घेऊन जाऊ नये ही विनंती त्यांनी केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला आदेश दिल्याने आम्ही हा मोर्चा आजाद मैदानात करणार आहोत असे सांगितले.
          मंगळवारी याच मुद्द्यावरुन फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. “ मुंबईतील निष्पापांचा बळी घेणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा आणि अनेक देशविरोधी कारवायांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर संगनमत करून अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांनी मोक्याच्या जमिनी खरेदी केल्या. मुनीरा यांची जमीन खोटे मुखत्यारपत्र तयार करुन विकत घेण्यात आली आणि त्यांना पैसेही देण्यात आले नाहीत.
         कुर्ला येथे त्यावेळी दोन हजार रुपये चौ.फूट दर असताना केवळ २५ रुपये चौ.फुटाने जमीन खरेदी केल्याचे दाखविले गेले व तीही रक्कम दिली गेली नाही. हसीना पारकर यांनी सुमारे ६०० कोटी रुपयांचे जमिनींचे व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. मलिक यांनी कुर्ला येथील जमीन बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या हसीना पारकर यांच्या हस्तकांकरवी खरेदी केली.
      अनिल देशमुख आणि संजय राठोड या मंत्र्यांचा राजीनामा आरोप झाल्यावर घेण्यात आला. मात्र, मलिक यांनी देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करुनही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना वेगळा न्याय कशासाठी आणि त्यातून कोणता संदेश महाविकास आघाडीला द्यायचा आहे,” असा सवाल फडणवीस यांनी केला.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...