राज्यात भाजपची सत्ता पुन्हा मी येऊ देणार नाही --शरद पवार
"शरद पवार साहेब भाजपची काळजी करू नका" --भाजप
भिवंडी, दिं,१८, अरुण पाटील (कोपर) :
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालं आहे. भाजपकडून एकामागेएक असे आरोप महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांवर करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा एकही मुद्दा भाजप सोडत नाहीये. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी भेट घेतली. या भेटीवेळी युवा आमदारांनी आपले काही प्रश्नही शरद पवारांसमोर मांडले. त्यानंतर शरद पवारांनी युवा आमदारांना म्हटलं, "घाबरू नका, राज्यात भाजपची सत्ता पुन्हा मी येऊ देणार नाही". शरद पवारांच्या या निर्धारावरुन भाजपने निशाणा साधला आहे.
भाजपने ट्विट करत म्हटलं, "आदरणीय शरद पवार जी, कोण येणार? कोण नाही? हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल
भाजपने आणखी एक ट्विट करत म्हटलं, आदरणीय शरद पवार साहेब, भाजपची काळजी करू नका स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा.
आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये भाजपने म्हटलं, "भाजपला येऊ न देण्याच्या गोष्टी नंतर करा. आधी हे प्रश्न सोडून दाखवा!
(1)राज्यात एसटी बंद, 6 महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत.
(2)राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, पिकं उभं उभं करपून जात आहेत.
(3)मराठा, OBC आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवा.
भाजपने केलेल्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (17 मार्च 2022) बैठक घेऊन मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे. तर त्यांच्याकडील खात्याचा अतिरिक्त पदभार हा जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह सुप्रिया सुळे बैठकीला हजर होत्या. या बैठकीमध्ये मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा, पेनड्राईव्ह प्रकरणाबाबत चर्चा झाली.

No comments:
Post a Comment