छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब काहींना कळलेच नाहीत - ज्ञानेश महाराव
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने आजही काही ढोंगी लोक सांगत आहेत, काहींनी यावरून महाराष्ट्र भूषण सुद्धा घेतले पण खरे छत्रपती शिवाजी महाराज पोवाड्यातून सादर केले ते महात्मा जोतिबा फुले यांनी असे परखड मत जेष्ठ पत्रकार आणि चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी सदिच्छा सामाजिक विकास संस्थेने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्यात मांडले. सदर कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, माटुंगा लेबर कॅम्प, येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कवी गझलकार गजानन तुपे, माजी सहा. पोलीस आयुक्त धनंजय वंजारी, स्थानिक नगरसेविका सौ. हर्षला मोरे, समाजसेवक आशिष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नावर भाष्य केले, ज्यांना साधी गणपतीची आरती पाठ नाही, असे लोक हनुमान चालीसा पठण करण्यास सांगत आहेत, जातीय तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण बदलण्यासाठी चाललेली ही धडपड बघवत नाही, नोटबंदी पासून देशाला लागलेले ग्रहण आणि नंतर कोरोनाच्या पादुर्भावामुळे जनतेची झालेली निराशा, नुकसानभरपाई यापुढे आता वाढत चाललेल्या तेलाच्या किंमती, प्रचंड महागाई या अनेक विषयांवर अगदी कवितेतून गाण्यातून त्यांनी आपली मते मांडताना भविष्यात देश लोकशाही मुक्त करण्याचा कुटील डाव, संविधान नष्ट करण्याची चाल, याबाबत सविस्तर मते मांडली. यावेळी कवी गझलकार गजानन तुपे यानी चालू घडामोडी आणि स्त्री जातीला दिली जाणारी आजही हीन वागणूक यावर कविता सादर केल्या, काही रचना, गझल सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. माजी सहा. पोलीस आयुक्त यांनी नेहमीप्रमाणे देशात चाललेल्या घडामोडीवर भाष्य केले. देशाच्या पंतप्रधान यांना इतर देशांप्रमाणे राष्ट्राध्यक्ष निवडणूक हवी आहे. त्यांना लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुका नको आहेत, संविधान बदलण्यासाठी अहोरात्र काम सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी सदिच्छा सामाजिक विकास संस्थेच्या वतीने धम्माचे विचार लोकांना पठवून देणारे आयु नाना कांबळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक मान्यवरांचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली तर सूत्रसंचालन शशिकांत गायकवाड यांनी केले तर संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत करून सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
No comments:
Post a Comment