धुळे पोलिसांनी मोठी कारवाई करत एसयूव्ही जीप मधून ४ आरोपी कडून केल्या ९० तलवारी जप्त !!
भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :
धुळ सोनगीर पोलिसांनी तलवारींचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनाची तपासणी केली. या वाहनात त्यांना ९० तलवारी आढळून आल्या. वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वाहन वेगाने पळवल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी वाहनाचा पाठलाग करून त्यास गाठले.
सोनगीर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ क्र. एमएच.०९ एम.००१५ ला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता ती सुसाट पळवली. म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून गाडी थांबवून विचारणा केली. गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता गाडीत ९० तलवारी आढळून आल्या.
सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींसोबत ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम, कपिल विष्णू दाभाडे सर्व राहणार जालना येथील असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ गाडी, ९० तलवारीसह ७ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व मोटार वाहन कायदा कलम १८४, २३९/ १७७ प्रमाणे सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे तलवारी चित्तोडगड येथून जालना येथे घेऊन जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यांचा हेतू काय होता, याचा तपास सध्या धुळे पोलीस करीत आहेत. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, विभागीय पोलीस उपाधीक्षक प्रदीप मैराळे, सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment