हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे पं.स. गुहागरच्या कृषी विभागातर्फे आबलोलीत प्रशिक्षण संपन्न !!
निवोशी/ गुहागर -उदय दणदणे :
शुक्रवार दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषदेचे रत्नागिरी कृषी विभागाच्या सहकार्याने पंचायत समिती गुहागरमार्फत यावर्षीच्या खरीप हंगामात 'हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम' राबविण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे प्रशिक्षण संपन्न झाले.
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मंडणगड तालुक्यात हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत 'पथदर्शक प्रकल्प' राबविण्यात आला होता. SK-4 (स्पेशल कोकण -4) या हळदीच्या वाणाच्या बियाण्याचा वापर करून हळकुंडापासून रोपे तयार करून हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला होता. या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात एका रोपांपासून शेतक-यांनी 4 किलोपर्यंतचा गड्डा उत्पादीत केला होता.
याच पद्धतीचा प्रकल्प जिल्हा परिषदेच्या सहकार्याने गुहागर पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. सुमारे ५ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येऊन या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात अगदी सुरूवातीपासून हळद लागवड ते हळद काढणीपर्यंतचा संपूर्ण कालावधीत तांत्रिक मार्गदर्शन पं.स.च्या कृषी विभागामार्फत करण्यात आले.
सदर प्रकल्पातील पहिला टप्पा म्हणून डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्याकडून विकसीत केलेले हळकुंडापासून रोपे तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग या प्रकल्पात करण्यात येणार आहे. या हळद रोपांच्या लागवडीपासून किड-रोगाबाबत संरक्षीत व अपेक्षित उत्पादन मिळतेच मात्र शेतक-यांना स्वतःचे हळदीचे बियाणे स्वतःच निर्माण करता येणार आहे. सन २०२२-२३ या वर्षी या प्रकल्पात SK-4 (Special konkan) या हळदीच्या वाणाचा उपयोग करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाची प्राथमिक माहिती देण्यासाठी तसेच हळकुंडापासून रोपे तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गुहागर तालुक्यातील इच्छुक शेतक-यांसाठी पं.स.गुहागरच्या कृषी विभागातर्फे हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 'व' 'हळकुंडापासून रोपे तयार करणे* बाबतचं प्रशिक्षण वजा प्रात्यक्षिक या वेळी आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी माजी सभापती पुर्वी निम्हणकर, पुनम पास्टे, माजी प.स.सदस्य रविन्द्र आंबेकर, आबलोलीचे माजी सरपंच अल्पिता पवार, काशिनाथ मोहिते, मंदार जोशी, सचिव कारेकर, पं.समितीचे कृषी अधिकारी आर. के.धायगुडे साहेब उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी प्रशिक्षणांर्थीना सदर प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून हळद लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सेंद्रिय खतांविषयी मंदार जोशी साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच ज्यांनी या हळद लागवडीवर खास अभ्यास करुन sk4 या दर्जेदार बियाणांची निर्मिती केली असे आबलोलीचे सचिन कारेकर यांनी स्वतः या प्रशिक्षणाचे नियोजन केले होते. त्यांनीही मोलाची माहिती दिली. शेवटी सचिन कारेकर सरांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सर्वांना एक एक जांबाचे रोप भेट म्हणून दिले.
सदर प्रशिक्षण सर्व इच्छुक शेतकऱ्यांसाठी आणि बचत गटांसाठी खुले होते. या प्रशिक्षण उपक्रमात तालुक्यातील अंदाजे ५० प्रशिक्षणांर्थीनी सहभाग घेतला होता. यामध्ये उमराठच्या ग्रामपंचायतीने बचत गटाच्या ९ महिलांना व एका शेतकऱ्याला प्रशिक्षणाला पाठविले होते. यामध्ये पोलीस पाटील वासंती आंबेकर, राधा आंबेकर, वैष्णवी पवार, सानिका पवार, रूचिता डिंगणकर, निशा गावणंग, प्रणिता गावणंग, सुनिता गावणंग, कृणाली गोरिवले आणि शशिकांत गावणंग यांचा सहभाग होता. प्रशिक्षण स्थळी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. अमोल भोसले साहेब यांनी सुद्धा भेट दिली शेवटी कृषी अधिकारी आर.के. धायगुडे साहेब यांनी सर्वांचे आभार मानून समारोप केला.
अशा प्रकारचे नियोजनबद्ध आणि उत्तम प्रशिक्षण पंचायत समितीच्या कृषी विभागाने दिल्याबद्दल कृषी विभागाचे तसेच सर्व प्रशिक्षकांचे ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आभार मानले आहेत.




No comments:
Post a Comment