Saturday, 21 May 2022

टॅक्स पावती नाही तर नळ नाही या नियमाचा हजारो नागरिकांना फटका ! "अमृत योजना कागदावरच" *संदप गावातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता*

टॅक्स पावती नाही तर नळ नाही या नियमाचा हजारो नागरिकांना फटका ! "अमृत योजना कागदावरच"

*संदप गावातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता*


कल्याण, (संदीप शेंडगे) : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील वन विभागाच्या जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांना टॅक्स पावती न देण्याचा दुर्दैवी निर्णय कल्याण- डोंबिवली प्रशासनाने घेतला आहे, त्यामुळे हजारो नागरिक नळ कनेक्शन पासून वंचित असून त्यांना जवळील उल्हास नदीत मध्ये कपडे धुण्यासाठी तसेच वापरण्यासाठी पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. 
           केंद्र सरकारने भारतातील प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची महत्त्वकांक्षी अमृत योजना आखली आहे परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधील समन्वय नसल्याने तसेच वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे अमृत योजनेचा येथील हजारो नागरिकांना फायदा होत नसल्याचे लक्षात आले आहे त्यामुळे अमृत योजना कागदावरच राहिली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
      पिण्यासाठी तसेच वापरण्यासाठी पाणी नसल्याने संदप गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी तसेच वापरण्यासाठी पाणी आणण्याकरिता जवळील खदानीत जावे लागत होते याच खदानी मध्ये एकाच कुटुंबांमधील पाच जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते त्यांनी या गावातील नागरिकांसाठी तात्पुरती पाणी योजना सुरू केली आहे. 
        परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वन विभागाच्या जमिनीवरील मोहोने भागातील जेतवन नगर, धम्मदीप नगर, तक्षशिला नगर, समता मार्ग रामजी नगर, तीपन्ना नगर, टिटवाळा येथील इंदिरानगर, बल्याणी टेकडी, बल्याणी गावं, आदी भागातील हजारो नागरिकांना कडोंमपा प्रशासनाकडून नळ कनेक्शन मंजूर करून दिले जात नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी तसेच वापरण्याच्या पाण्यासाठी जवळील उल्हास नदी मध्ये जावे लागत आहे त्यामुळे संदप गावातील दुर्घटने प्रमाणे येथेही अशीच दुर्घटना घडू शकते.
       वनविभागाच्या जमिनीवरील नागरिकांना गेल्यात तीस ते चाळीस वर्षापासून नळ कनेक्शन दिले जात होते. परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून वन विभागाच्या जमीनीवरील घरांना नळ कनेक्शन दिले जात नाही. पालिका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता वन विभागाने आम्हाला पत्र दिले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जमिनीवरील घरांना टॅक्स बिल आकारणी करण्यात येऊ नये त्यामुळे कडोंमपा प्रशासनाने टॅक्स न आकरण्याचा निर्णय घेतला आहे.
      टॅक्स पावती नसल्यामुळे नळ कनेक्शन मिळत नसल्याने हजारो नागरिक पाण्यापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाने आणि वन विभागाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नळ कनेक्शन कसे उपलब्ध करून देण्यात येईल याचा विचार करावा.

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...