केंद्रा पाठोपाठ राज्य सरकारकडूनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात !
भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील (कोपर) :
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. त्या पाठोपाठ आता राज्य सरकारनेही सामान्यांना इंधन दर कपातीचा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये २ रूपये ८ पैसे तर डिझेलच्या दरांमध्ये १ रूपया ४४ पैसे कपात महाराष्ट्रात करण्यात आली आहे. शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरांमध्ये लिटर मागे ८ रूपये तर डिझेलचे दर ६ रूपयांनी कमी केले होते.
केंद्र शासनाने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. या मुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. या नंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते, त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे.
No comments:
Post a Comment