Monday, 23 May 2022

"महाराष्ट्रातील आघाडी सरकारने जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे".... एडवोकेट डॉक्टर सुरेश माने

"महाराष्ट्रातील आघाडी सरकारने जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे".... एडवोकेट डॉक्टर सुरेश माने


मुंबई, बातमीदार : मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्या असा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही, ज्या पद्धतीने, तडफेने, तत्परतेने मध्य प्रदेश मधील शिवराज चव्हाण सरकारने राज्याचा विधी व न्याय विभाग, सक्षम वकिलांची फौज व समर्पित आयोगाचे तातडीने कामकाज यावर फोकस करून आणि विशेष म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला प्राथमिकता देऊन सर्वोच्च न्यायालयाद्वारेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मध्य प्रदेशात मोकळा केला, मात्र महाराष्ट्रात महाराष्ट्राचे माननीय शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते यांचे सरकार राजकीय भोंगे, हिंदुत्वाचे क्षुद्र राजकारण, आयोध्याची न वाजणारी पुंगी, व ब्राह्मणांशी समझोता अशा क्षुल्लक मुद्द्यावर  अडकून राहिले आणि महाराष्ट्राचे मंत्री हे मंत्र्याची जबाबदारी पूर्ण करण्याऐवजी पक्षाच्या नेत्यासारखेच बयानबाजी करत बसले त्यामुळे जे ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत करणे आवश्यक होते ते सोडून नॉन इश्यू मध्ये सरकार, मंत्री व नेते अडकून राहिले याचा सर्वस्वी परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणाची हत्या होय. 


थोडक्यात काय तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी जे मध्यप्रदेशातील सरकारला करता आले ते महाराष्ट्रातील शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सरकारला करता आले नाही हे मोठे महाराष्ट्र आघाडीच्या सरकारचे अपयश होय असा वास्तववादी आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर सुरेश माने सर यांनी दिनांक बावीस मे दोन हजार बावीस रोजी रायगड जिल्ह्यातील उलवे याठिकाणी पक्षाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी आयोजित जाहीर सभेमध्ये केला. या सभेचे आयोजन पक्षाच्या नव स्थापित उलवे शाखेच्यावतीने करण्यात आलेले होते. याप्रसंगी एडवोकेट डॉक्टर सुरेश माने सरांच्या शिवाय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे साळवे व वंचित बहुजन आघाडीचे मौलाना हेदेखील पक्षाच्या विचारपीठावर उपस्थित होते.

बी आर एस पी च्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसीचे आरक्षण व ओबीसींची जनगणना या दोन विषयावर आयोजीत जाहीर सभेला सविस्तर मार्गदर्शन करताना एडवोकेट डॉक्टर सुरेश माने सरांनी ओबीसी जनगणने बाबत आर एस एस वर थेट आरोप करताना म्हणाले की ओबीसी जनगणनेला विरोध करणारी बीजेपी ची मातृसंस्था आर एस एस हीच जबाबदार आहे कारण ओबीसी आयडेंटिटी मुळे हिंदू समाजातील मोठा घटक वेगळा होऊ नये या भीतीपोटी हिंदुत्वाचे विभाजन नको या धोरणाखाली आर एस एस ने ओबीसी जनगणनेला विरोध केला व त्याच मुळे आम्ही ओबीसी जनगणना करणार नाही असे सरकारी धोरण मोदी सरकारने लोकसभेमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्याद्वारे जाहीर करून ओबीसींच्या विकासाला कायमची खीळ घातलेली आहे.

महाराष्ट्रातील सरकारचे आरक्षण धोरणी अपयश स्पष्ट करताना एडवोकेट माने सर यांनी राज्यातील मुस्लिम समाजाकरिता 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेले 50 टक्के शैक्षणिक आरक्षण लागू न करणे शिवाय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही आज सुद्धा मागासवर्गीय कर्मचारी यांचे पदोन्नती मधील आरक्षण लागू न करणे शिवाय भटक्या विमुक्तांच्या आरक्षण प्रश्नी सरकारने चुकीची भूमिका घेणे अशी सरकारच्या अपयशाची मालिकाच स्पष्ट करताना राज्यातील महा विकास आघाडी सरकार आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील वचनानुसार राज्यकारभार करीत नसल्याचे स्पष्ट केले. 

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसी आरक्षण याबाबत डॉक्टर माने म्हणाले की या प्रश्नासाठी 2016 ते 2019 या काळातील बीजेपी फडणवीस सरकार सुद्धा तितकेच जबाबदार असून राज्यातील महा विकास आघाडी सरकारला बीजेपी सरकार ची ऐतिहासिक चूक सुधारण्याची सुवर्णसंधी असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने योग्य व तात्काळ पावले न उचलून ही संधी दवडून बीजेपी वर मात करण्याची राजकीय संधी गमावली आहे व त्याच बरोबर ओबीसी समाज घटकाला न्याय देण्यामध्ये राज्यातील आघाडी सरकारला अपयश आले आहे ही राज्य सरकारची शोकांतिका होय असे स्पष्टपणे नमूद केले. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे ओबीसी राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये कसे योग्य आहे याबाबत सविस्तर निवेदन राज्य सरकार स्थापित समर्पित ओबीसी आयोगाला देणार असल्याचेही एडवोकेट माने सर यांनी जाहीर केले

या सभेला पक्षाच्या पदाधिकारी यांच्याशिवाय रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष हिरवे ठाणे जिल्हा प्रभारी धनाजी सुरोसे, राज्य सचिव सतीश बनसोडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले तर उलवे पक्ष शाखाप्रभारी संतोष शिर्के यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये स्थानिक युवकांनी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करून रायगड जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी सभा व राजकारण यशस्वी करण्याची घोषणा केली यार एस पी च्या उलवे येथील या जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

सौजन्य :- सतीश बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ; +91 96195 74447

No comments:

Post a Comment

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक !

वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...