Wednesday, 29 June 2022

कोकणच्या रानातील रोवणे,अळंबी शेतकऱ्यांच्या हंगामी भाज्या ! "निसर्गाचा वरदहस्त कोकणाला...कोकण म्हाणजे स्वर्गच"

कोकणच्या रानातील रोवणे,अळंबी शेतकऱ्यांच्या हंगामी भाज्या !

"निसर्गाचा वरदहस्त कोकणाला...कोकण म्हाणजे स्वर्गच"


कोकण, (शांत्ताराम गुडेकर) :

  कोकण हा प्रदेश भारत पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे.
                कोकण म्हटलं, की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या-खाड्या आणि अथांग समुद्र ! कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे, हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच ! सर्वत्र पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते. डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. गढूळ पाण्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पाश्वर्भूमीवर उनपावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण असतं. सलग सुट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करीत आहे.
              कोकणात जुलै महिन्यात भरपूर पाऊस पडत असतो व भर पावसातच अत्यंत चवदार, भरपूर प्रथिनांचा स्त्रोत असलेले चार ते पाच अळंबीचे प्रकार  कोकणातील जंगलात रुजून येतात. विशेष म्हणजे सतत पाऊस पडला व तापमान २० ते २३°सें.ग्रे. पर्यंत खाली आले की हे अळंबीचे प्रकार रानातील जाळीत किंवा वाळवीच्या ठिकाणी रूजतात. यातील एक दोन प्रजातींच्या स्पाॅनचे कॅरीअर वाळवी आहे. स्थानिक गुराखी, शेतकरी यांना दरवर्षी अळंबी कुठे कुठे रूजते त्या जागा माहित असतात व ते न चुकता त्या ठिकाणी दोन तीन दिवस लक्ष ठेवून असतात. आदल्या दिवशी कळल्यावर दुस-या दिवशी लवकर जाऊन तेथील अळंबी काढून आणतात. शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारातील पाककृतीना चवीच्या बाबतीत सहज मागे टाकतील एवढी ही अळंबी चवदार असतात. त्यामुळे ज्यांना ही अळंबी मिळाली ते लोक नशीबवान समजतात. स्थानिक अळंबीची नावे १) रोवण २) चुडीये ३) कुरटे ४) कुंबळे ५)चितळे अशी आहेत.
          रोवण ही अळंबी एका जागी फार मोठ्या प्रमाणात येते. उंची साधारणपणे दोन इंच असते. कॅप सफेद रंगाची, व मध्ये जांभळ्या रंग असतो. दांडा (देठ) मातीतून खणून काढावा लागतो.  चवीला अप्रतिम असते. मटणाला उत्कृष्ट शाकाहारी पर्याय आहे. सूप, भाजी, सुकी भाजी, सर्वच प्रकार चवदार व स्वादिष्ट होतात.

          *चुडीये ही अळंबी लांब लांबीची असते. दांडी ६ ते १८ इंच असते. ही अळंबी काहीशी कमी आढळते. चवीला उत्तम असते. गरम मसाला वापरून भाजी छान होते.* 

          *कुरटे ही अळंबी एका ठिकाणी एखादीच सापडते. ब-याच ठिकाणी फिरल्यावर पाच सहा मिळतात. चव छान, कालवण उत्तम होते.*

          *कुंबळे ही अळंबी चुडीये  प्रकारासारखीच असते. मात्र लांबीला कमी असते. चव चांगली असते पण दुर्मिळ प्रजाती आहे.*

          *चितळे ही अळंबी नाकातील फुल्ली सारखी नाजूक व खूप लहान असते. वारूळावर रूजते. अलगद काढून चांगली सर्वत्रच धुवून घ्यावी लागते. याचे सूप, कालवण व भाजी छान होते. चवदार व स्वादिष्ट लागते.*

          रायगड जिल्ह्यात आदिवासी कातकरी बांधवांची वस्ती असलेल्या श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात यातील अळंबीचे प्रकार स्थानिक बाजारात आदिवासी बांधव विक्रीसाठी आणतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ही स्थानिक अळंबी बाजारात मिळत नाही.निसर्गाने कोकणाला ही मौल्यवान भेटी दिली असली तरी कोकणातील दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने त्यावर काही संशोधन केल्याचे व अळंबीचे स्पाॅन निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. हे कोकणाचे दुर्दैव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोजक्याच लोकांना या अळंबीची चव चाखता येते. अळंबी ही बुरशी वर्गीय असल्याने त्याचे आयुष्य खूप कमी म्हणजे एक दिवसच असते. त्यानंतर त्यात लहान लहान किटक निर्माण होतात. मात्र फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास ती दीर्घकाळ टिकू शकतात. अळंबीचे बी हे सूक्ष्म स्पॉन स्वरुपात असतात व ते अळंबीच्या कॅपमध्ये असतात. कोकणात उपरोक्त रान भाज्या खूपच प्रसिध्द असून पावसाळ्यात कोकण भुमिपुत्र असलेला सद्यस्थितीत नोकरी निमिताने चाकरमानी (मुंबईकर) झाला असला तरी या चुडिया, कुरटे, कुंबळे, चितळे, रोवने यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. फोटोत जरी या भाज्या बघितल्या तरी तोंडाला पाणी सुटते हे कोकण भुमिपुत्र चाकरमानी नाकारु शकत नाही.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...