Tuesday 28 June 2022

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याची मुसंडी ‘जिल्ह्यांचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल’ प्रकाशित

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र तर राज्यात सातारा जिल्ह्याची मुसंडी 
                ‘जिल्ह्यांचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल’ प्रकाशित


नवी दिल्ली, दि. 28 : केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात’ महाराष्ट्राने एका  श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेवटच्या क्रमांकाहून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेत सातारा जिल्ह्याने या निर्देशाकांत ‘अती उत्तम श्रेणी’  गाठली आहे.


               केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय आणि साक्षरता विभागाने सोमवारी शैक्षणिक वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठीचा श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल असून याद्वारे शालेय शिक्षणाच्या प्रगतीचा राज्यांतर्गत तुलनात्मक आलेख मांडण्यात आला आहे. 
                
            केंद्राच्या शालेय आणि साक्षरता विभागाने राज्यांसाठी ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ (PGI) तयार केला आणि संदर्भ वर्ष 2017-18 ते 2019-20 हे धरून अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वर्ष 2018-19 साठी 725 जिल्ह्यांची तर वर्ष 2019-20साठी 733 जिल्ह्यांची गुणात्मक क्रमवारी प्रकाशित करण्यात आली आहे. 

            महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावला.....

         देशातील सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधून प्राप्त माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या राज्यांच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने वर्ष 2018-19 मधील ‘श्रेणी 1’ वरून वर्ष 2019-20 मध्ये ‘श्रेणी 1+’ अशी प्रगती केली आहे. या अहवालांतर्गत देशातील राज्यांना प्रगतीच्या आधारे एकूण 1000 गुणांकानुसार एकूण 10 श्रेणीत  विभागण्‍यात आले आहे. वर्ष 2018-19 मध्ये महाराष्ट्राने 801 ते 850 गुणांच्या ‘श्रेणी 1’ मध्ये स्थान मिळविलेल्या दोन राज्यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर  वर्ष 2019-20 मध्ये राज्याने या अहवालात 869 गुण मिळवून ‘श्रेणी 1+’ मध्ये स्थान मिळविले आहे.याच श्रेणीत देशातील एकूण 7 राज्यांचा समावेश आहे.
 
             सातारा जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी.....  
      
        ‘जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांका’त महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत सातारा जिल्ह्याने उत्तम कामगिरी करत वर्ष 2018-19 मधील शेवटच्या स्थानाहून (प्रचेष्टा-३) वर्ष 2019-20मध्ये थेट ‘अती उत्तम श्रेणीत’ स्थान मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.    

          जिल्हास्तरीय श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकाच्या–(PGI-D) रचनेत, ‘परिणाम, वर्गांमधील व्यवहारांचा प्रभाव,शाळेतील  पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि नियमन प्रक्रिया’अशा 6 श्रेणींमध्ये एकूण 83 निर्देशकांआधारे 600 गुण देण्यात आले आहेत. एकूण प्राप्त गुणांची प्रतवारी 9 श्रेणीत केली असून यात 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त जिल्ह्याची प्रतवारी ‘दक्ष’ श्रेणीत केली आहे. 81 ते 90 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्कर्ष’, 71 ते 80 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘अतीउत्तम’,  61 ते 70 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘उत्तम’, 51 ते 60 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा 1’, 41 ते 50 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना ‘प्रचेष्टा 2’ आणि 31 ते 40 टक्के गुण प्राप्त जिल्ह्यांना  ‘प्रचेष्टा3’ अशा श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.
 
             वर्ष 2019-20मध्ये राज्यातील 25 जिल्हे ‘उत्तम श्रेणी’त 

       वर्ष 2019-20मध्ये ‘अती उत्तम श्रेणी’त देशातील 20 जिल्ह्यांनी स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून सातारा या एकमेव जिल्ह्याने 423 गुणांसह या श्रेणीत स्थान मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकाविले आहे. याच वर्षी उत्तम श्रेणीत राज्यातील 25 जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे, या श्रेणीत देशातील 95 जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा 1’ तर एका जिल्ह्याचा समावेश प्रचेष्टा 2 मध्ये आहे.

        वर्ष 2018-19 मध्ये ‘उत्तम श्रेणी’त देशातील 89 जिल्ह्यांनी  स्थान मिळविले तर महाराष्ट्रातून 12 जिल्ह्यांनी  या  श्रेणीत स्थान मिळविले आहे. याच वर्षी ‘प्रचेष्टा 1’ श्रेणीत राज्यातील 15 जिल्ह्यांनी स्थान मिळविले आहे तर 4 जिल्ह्यांचा समावेश ‘प्रचेष्टा 2’ आणि 5 जिल्ह्यांचा समावेश प्रचेष्टा 3 मध्ये करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...