Tuesday 28 June 2022

कोकणातील चढणीचे मासे...... (मुंबई, ठाणे- भिवंडीत या माश्यांच्या प्रवासाला 'वलगन' तर नवी मुंबई, अलिबाग, उरण, पेण येथे 'उधवन' )

कोकणातील चढणीचे मासे......

(मुंबई, ठाणे- भिवंडीत या माश्यांच्या प्रवासाला 'वलगन' तर नवी मुंबई, अलिबाग, उरण, पेण येथे 'उधवन' )


कोकण, (शांताराम गुडेकर) :
               कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
            समुद्रात पावसाळ्यात मोठी भरती येते त्यावेळी काही मासे समुद्राच्या प्रवाहा विरुध्द प्रवास करीत प्रजननासाठी खाडी, ओहोळ या ठिकाणी अगदी झुंडाच्या झुंडीने जातात. या झुंडीला 'वलगन' म्हणतात. मुंबई,ठाणे- भिवंडीत या मास्यांच्या प्रवासाला 'वलगन' तर नवी मुंबई, अलिबाग, उरण, पेण येथे 'उधवन' म्हणतात. त्याला कारण म्हणजे दर्याच्या येणाऱ्या उधाणामुळे उध्दभवलेल्या या माशांच्या क्रियेला उधवन म्हटले जाते. 'वलगन' आणि 'उधवन' दोन्ही आगरी-कोळी बोली भाषेतील शब्द आहेत.या वलगनीत प्रामुख्याने 'चिमणी, कोळंबी आणि शिवरा' हे व इतर मासे आढळुन येतात. परंतु वलगनीत प्रसिध्द असलेला तसेच खवय्यांना आवडणारा मास्यांचा प्रकार म्हणजे 'चिमणी मासा'. स्थानिक आगरी-कोळी बांधव यालाच 'वलगनीची चिवनी' म्हणुन संबोधतात. 'देणे वाला जब भी देता,देता छप्पर फाड के' या उक्ती प्रमाणे वा एखादी लाॅटरी लागावी तशी हजारो- लाखो मास्यांची पलटन मासेमारी करणाऱ्याच्या जाळ्यात ही वलगन देते. समुद्रात मासेमारी बंद असल्याने मासळी बाजारात मास्यांचा तुटवडा असतो त्यामुळेच या वेळेस बाजारात 'वलगनीची चिवनीला' खुप मागणी असते. त्याला अजुन एक कारण देखील आहे ते म्हणजे खवय्यांना या काळात चिमणी मास्यातील गाबोळी (मास्यांची अंडी) खावयास मिळते. संध्या बाजारभाव २०० रूपयाना ६/७ चिमण्या (चिवण्या) असल्या तरी देखील खवये विकत घेतात. 

ही वलगन खाडीतुन शेतात, डोंगराळ भागात, ओहोळात वा तलावातही प्रवास करीत असल्याने अनेक स्थानिक बांधव मौज म्हणुन एखादा सण साजरा करावा तसे वलगनीचे मासे पकडण्यासाठी जातात. कारण ही वलगन वर्षातुन एकदाच येते आणि तेही पावसाळा सुरु झाला की किमान १५ ते ३० दिवस असते.ही वलगन पकडण्याच्या अनेक पध्दती आहेत. वलगनीची चिमणी पकडण्यासाठी खाडीच्या बंधाऱ्यावर वा शेताच्या बांधावर जाळं लावले जाते त्याला छोटी डोली किंवा बोली भाषेत बोक्शी बोलतात. या बोक्शीत वलगन पाण्याच्या चढणीवर आपोआप येऊन अडकते. 

पावसाचे पडलेले खाडीतील पाणी ओहोळात जाते तिथेही हे मासे पेर (अंडी) टाकायला येतात मग काही जण २चा गाळा (जाळ) फेकुन म्हणजेच पाग टाकुन पकडतात. पाग टाकायला फार कौशल्य लागते आणि ही पारंपारिक पध्दत आहे. गाबोळी टाकायला आलेले असल्याने हे मासे या काळात इतके चपळ नसतात म्हणुन काही सहज गळानेही हे चिमणी मासे पकडतात. खरं तर अनेक तरुण, वयस्कर मंडळी पावसाचा मनसोक्त आनंद घेत आपल्या गृपने ही वलगन पकडण्यासाठी शेतावर वा खाडीवर जाळं, आसु, पाग, टोपली, भुसा, हे मासे पकडण्याचे साधने घेऊन जात असतात. मासे साठवणी साठी डोबला (टोपली) याचा वापर करतात. काही खवय्यांचा हे मासे पकडुन त्याच ठिकाणी पावसाची लज्जत घेत मस्त गरम-गरम खाण्यासाठी पार्टीचा बेत असतो. परंतु वलगनीची चिमणी पकडणे सोप्पे असले तरी तितकी खबरदारी घ्यावी लागते कारण या माशाच्या काट्यात विषारी घटक असल्याने काटा लागल्यास सुज येऊ शकते. थोडीशी खबरदारी घेत आपल्याला या वलगनीची मौज सहज लुटता येते कारण ही वलगन वर्षातुन एकदाच येते. 

पावसाळा सुरु झाला की कोकणी माणसाची शेतीच्या कामाची लगबग सुरु होते मात्र या शेतीच्या कामातुनही वेळात वेळ काढुन चढणीचे मासे पकडण्याची मज्जा तो दिवसा किंवा रात्री घेत असतो. पावसाळा सुरु होण्यापुर्वी कोकणातल्या बहुतांशी नदया या प्रवाहीत असल्या तरी डोंगरद-यातील पाण्यातील झरे लुप्त झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी काही नदयांत तो कोरडा असतो. नद्यांमधील मोठमोठे डोह व कोंडी या पाण्याने भरलेल्या असतात. उन्हाळ्यात पाणी जसे कमी कमी होत जाते तसे या नदयांमधील मासे या डोहात जमु लागतात. 

पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात, छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात. 

चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो. 

चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते. 

काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात. रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. 

कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा, सुतेरी, शिंगटी, दांडकी, वाळव, पानकी, काडी इ. मासे मिळतात. आत्ता या पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या झणझणीत माशांवर ताव मारायचा असेल तर कोकणाला नक्की भेट दया. काय मग येताय ना कोकणात चढणीचे मासे खायला.....!

No comments:

Post a Comment

दिव्यातील रिक्षा, बस व रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी तुषार पाटील स्थापन करणार दिवा प्रवासी संघटना !

दिव्यातील रिक्षा, बस व रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी तुषार पाटील स्थापन करणार दिवा प्रवासी संघटना ! दिवा, ता. 30 एप्रिल (ब...