Wednesday, 3 August 2022

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षणविभागाचा खेळखंडोबा, शाळांमध्ये शौचालये नसल्याने विद्यार्थ्यांनींची कुंचबना ! शिक्षण विभागात कागदीघोडे नाचविण्याचे शिक्षण ?

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षणविभागाचा खेळखंडोबा, शाळांमध्ये शौचालये नसल्याने विद्यार्थ्यांनींची कुंचबना ! शिक्षण विभागात कागदीघोडे नाचविण्याचे शिक्षण ?




कल्याण, (संजय कांबळे) : सब बढे, सब पढे, स्कूल चले हम, सारे शिकुया पुढे जाऊया, डिजिटल शाळा, आदी मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या आणि लाखों रुपये शिक्षणावर खर्च केल्याचा टेंभा मिरवणा-या जिल्हा परिषदेच्या शाळेत साधी शौचालये नसावीत ? हे तालुक्यासाठी भूषणावह आहे का ? कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील खेळखंडोबा कधी थांबणार ? प्रस्ताव, भेटी, मागणी असे एक ना अनेक कागदी घोडे नाचविण्यात शिक्षण विभाग धन्यता माणत असून केवळ शाळेला शौचालय नसल्याने वर्ग खोल्या ताब्यात न घेण्याचा आणि यातून काही दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांना घेऊन दप्तर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.


कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२० शाळा आहेत, यातील अनेक शाळांमध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, मुतारी आदी मुलभूत सोईसुविधा नाहीत, ज्या शाळेत कसेबसे मोडके तोडके शौचालय आहेत तेथे पाण्याची टंचाई, अशी या सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी, मुले यांची कुंचबना होते, नैसर्गिक विधी दाबून ठेवला तर त्याचे वाईट परिणाम शरीरात होतात असे तज्ञांचे म्हणने आहे. फळेगाव, उतणे चिंचवली, म्हारळ, आदी विविध शाळेत गैरसोय आहेत. निंबवली, बापसई, वाळकस, आदी अनेक शाळांच्या दुरावस्थेविरोधात पंचायत समिती सदस्यांनी बैठकीत आवाज उठवला होता, परंतु त्यावर शिक्षण विभागाने काय कारवाई केली हा संशोधनाचा विषय आहे. शिक्षण विभागाच्या विरोधात इतका असंतोष निर्माण झाला होता की गटशिक्षणाधिका-यांना अकार्यक्षम ठरवून त्यांचा पदभार काढण्याचा ठराव देखील मासिक बैठकीत समत करण्यात आला होता.


परंतु यानंतर तरी शिक्षण विभागात सुधारणा होईल असे वाटतं होते. परंतु ये रे माझ्या मागल्या,सुरू आहे, तालुक्यातील फळेगाव ग्रामस्थांनी २५ आँक्टोबर २०२१ रोजी शाळेस शौचालय नसल्यामुळे विद्यार्थीनी व शिक्षकांची कुंचबना होत आहे, त्यामुळे आम्ही नवीन वर्ग खोल्या ताब्यात घेणार नाही असा ठराव केला होता. याला आता एक वर्ष होईल, परंतु अद्याप यावर उपाय योजना झाली नाही, त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य चंद्रकांत भोईर यांनी पुन्हा शिक्षण विभागास पत्र देऊन दफ्तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर माझी उपसभापती यशवंत दळवी यांनी उतणे शाळेच्या दुरावस्थेबाबतीत शिक्षण विस्तार अधिका-यांना झाप झाप झापले व दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

दरम्यान तालुक्यातील अनेक शाळेच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्या आहेत. तालुक्यातील अनाधिकृत शाळेचा प्रश्न तसाच आहे, केवळ नोटीस देणे ऐवढाच काय तो सोपस्कार उरकला जातो, वास्तविक पाहता शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांनी २७/५ आणि ८/६/२०२२ रोजी पत्र काढून अनाधिकृत शाळेवर कारवाई करणेबाबत निर्देश दिले आहेत. शिक्षण हक्क कायद्यातील कलम १८(५) अ नुसार अशा शाळा व्यवस्थापनाव दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असून भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ३४ब अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करता येवू शकतो, परंतु शिक्षण विभाग कागदी घोडे नाचवून खाँदे उडवायला मोकळे ? शिक्षण विभागाचा असाच भोंगळ कारभार सुरू राहिला तर भविष्यात तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शिक्षण विभागाचा खेळखंडोबा रोखायला हवा असे मत सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया

शौचालयासाठी पत्र देऊन आता एक वर्षे होईल परंतु अद्यापही शिक्षण विभागाने त्यावर काही उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे आता मोर्चा ची तयारी सुरु करावी लागेल,- चंद्रकांत भोईर, सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती,

*या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे, कदाचित तो मंजूर ही झाला असेल-अशोक भवारी-गटविकास अधिकारी, पंचायत समिती कल्याण.

No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...