Thursday 29 September 2022

दत्तनगर डोबिवली येथील अपात्र लाभार्थी पात्र घोषित ! 'इतर अपात्रा'ना सुध्दा पात्र घोषित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

दत्तनगर डोबिवली येथील अपात्र लाभार्थी पात्र घोषित !

'इतर अपात्रा'ना सुध्दा पात्र घोषित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी


कल्याण, बाळकृष्ण मोरे / खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी घोषित केल्याप्रमाणे बीएसयुपी प्रकल्पाची घरे लवकरच लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात येतील व डोंबिवली दत्तनगर येथील ९० अपात्र लाभार्थ्यांना पात्र घोषित करून सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच नियमानुसार कल्याण (प.) येथील शेकडोंच्या संख्येने पात्र, अपात्र, फेटाळलेले वंचित यांचे सुध्दा पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एलान बर्मावाला यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांना पत्र लिहून केली आहे.

या बाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने जसे दत्तनगर डोबिवली येथील अपात्र लाभार्थ्यांना पात्र घोषित करण्यात येत आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतू कल्याण (प.) येथील मागील १८ वर्षांपासून पात्र, अपात्र फेटाळलेले वंचित असे विस्थापितांना अडकवून घरांपासून वंचित ठेवलेल्या लाभार्थ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दत्तनगरच्या ९० बरोबरच कल्याण (प.) मधील शेकडोच्या संख्येने पात्र, अपात्र यांना सुध्दा पात्र घोषित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे व अपात्र ठरवून फेटाळलेले अर्ज याचा देखील विचार करून बीएसयुपी योजनेत समाविष्ट करून त्यांचे पुर्नवसन करण्यात यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

बीएसयुपी योजना केंद्र सरकारने २००५ / २००६ मध्ये जवाहलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरोत्थानच्या अंतर्गत झोपडपट्टी वासियांसाठी तयार केली होती. बीएसयुपी ची घरे झोपडपट्टी वासियाच्या पुनर्वसनासाठी केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे संयुक्त उपक्रम असल्याने कडोंमपा क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टी धारकांना त्यामध्ये पुनर्वसनाचा अधिकार आहे. असमर्थ नागरिक सेवाभावी संस्थेद्वारे मा. ठाणे जिल्हा पालकमंत्री, नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून व पत्र देवून अठरा वर्षापासून पुर्नवसनाची वाट पाहत असलेल्या लोकांच्या पुर्नवसन करण्याची विनंती केली आहे. परंतू त्यावर कडोमपाद्वारे कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

तरी आपण सर्वच कडोंमपा क्षेत्रातील नागरिकांना एकाच नजरेने पाहून सर्वच लोकांचे पुर्नवसन करण्यात पुढाकार घ्यावा व कल्याण डोंबिवली मधील नागरिकांमध्ये भेदभाव व पक्षपात होणार नाही, याची दक्षता घ्यावी व मागील वर्षानुवर्षे पात्र, अपात्र, फेटाळलेले, वंचित या मध्ये अडकून पडलेल्या कल्याण शहरांतील लोकांना आपण न्याय द्यावा व सर्वांचे पुर्नवसन लवकरात लवकर करावे, हीच आपणाकडून अपेक्षा असे या पत्रात असमर्थ सेवाभावी संस्थेचे एलाण बर्मावाला यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...