Monday 31 October 2022

जंगलांचा विनाश करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा पराभव - आरती कुलकर्णी

जंगलांचा विनाश करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा पराभव

- आरती कुलकर्णी


ॲमेझॉनच्या सदाहरित जंगलांसाठी कर्दनकाळ ठरलेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांचा अखेर पराभव झाला. ब्राझीलमधली ही निवडणूक ॲमेझाॅनच्या जंगलांचं भवितव्य ठरवणारी आहे, असं बोललं जात होतंच. आता बोल्सोनारो यांचा पराभव झाल्यामुळे ब्राझीलमधली ॲमेझाॅनची जंगलं मोकळा श्वास घेऊ शकतील, अशी थेट मतं पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहेत. आता नव्याने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले लुला डा सिल्वा यांनी ब्राझीलच्या जंगलांची हानी भरून काढण्याचं आश्वासन दिलं आहे. 

ॲमेझाॅनची सदाहरित जंगलं आणि वर्षावनं ही जगाची फुफ्फुसं मानली जातात. पण गेल्या २० वर्षांत इथली जंगली झपाट्याने नाहिशी झाली. बोल्सोनारो राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर पहिल्या तीनच वर्षातली आकडेवारी पाहिली तर आपल्या हे लक्षात येईल. 1 आँगस्ट 2019 ते 31 जुलै 2021 या काळात म्हणजे बोल्सोनारो यांच्या कारकिर्दीत 34 हजार चौ. कि.मी. जंगलाचा विनाश झाला, असं आकडेवारी सांगते. या नष्ट झालेल्या जंगलांचं क्षेत्र बेल्जियम या देशापेक्षाही जास्त आहे.  

याआधी ब्राझीलची ओळख ही जंगलांचं संवर्धन करणारा देश अशी होती. गेल्या दोन दशकांचा इतिहास पाहिला तर ब्राझीलमध्ये भूमिपुत्रांचा त्यांच्या जमिनींवरचा हक्क अबाधित होता, बेसुमार लाकूडतोडीला पायबंद घालण्यात आला होता. जंगलांच्या संवर्धनाची धोरणं आखली जात होती. पण बोल्सोनारो यांनी या सगळ्यालाच मूठमाती दिली.  

इथली जंगलं विकासाच्या नावाखाली कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आली. ही सदाहरित जंगलं वणव्यांच्या आगीत भस्मसात झाली. भांडवलदार आणि कंत्राटदारांना हाताशी धरून जंगलं जाळण्याचं षड्यंत्र रचण्यात आलं. अनिर्बंध लाकडूतोड करण्यात आली. बेसुमार खाणकाम सुरू झालं. जंगलं तोडून तेच क्षेत्र कोणत्याही नियोजनांशिवाय शेती आणि पशुपालनासाठी खुलं करण्यात आलं.  
ब्राझीलच्या या विनाशकारी धोरणांविरुद्ध जागतिक स्तरावरच असंतोष होता पण बोल्सोनारो यांना त्याची पर्वा नव्हती. ब्राझीलमधल्या पर्यावरणवादी चळवळी चिरडून टाकण्याचा त्यांनी चंगच बांधला होता.  
त्यांच्या या धोरणांमुळे आपण ॲमेझाॅनचं 17 टक्के वर्षावन गमावून बसलो आहोत, असं 2021 चा एक अहवाल सांगतो. तेव्हाच हा विनाश 20 ते 25 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज पर्यावरणवादी तज्ज्ञांनी बोलून दाखवला होता. 
राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणांमुळे एका देशाच्या आणि पर्यायाने जगाच्याच पर्यावरणाचा कसा विनाश होऊ शकतो याचं ब्राझील हे एक भयंकर उदाहरण आहे. आता नव्याने निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षांनी जंगलांचा विनाश करणाऱ्या धोरणांचं उच्चाटन करून या जंगलांचं संरक्षण करण्याचा निर्धार केला आहे. 

लुला डा सिल्वा हे डाव्या विचारसरणीचे राजकीय नेते मानले जातात. ब्राझीलमधल्या सध्याच्या राजकीय वातावरणात लूला हेच Greenest candidate आहेत, असं म्हटलं जात होतं. अशा पर्यावरणाला महत्त्व देणाऱ्या राजकीय नेत्याचा विजय झाल्यामुळे इथल्याच नव्हे तर जगभरातल्या पर्यावरणप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत.  

ॲमेझाॅनच्या जंगलाची आणि या जंगलांवर अवलंबून असलेल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे, असं वक्तव्य लूला यांनी केलं होतं. याआधी 2003 मध्ये जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा ब्राझीलमधली जंगलं नष्ट होण्याचं प्रमाण टोकाला गेलं होतं. पण त्यांनी जंगलं राखण्यासाठी बऱ्याच सुधारणा केल्या हे ते पुन्हापुन्हा सांगतात. यामुळेच त्यांच्याकडून पर्यावरणवाद्यांना मोठ्या आशा आहेत. 

लूला जर त्यांनी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे वागले तर ॲमेझाॅनच्या जंगलांमध्ये पुन्हा एकदा आशेचे किरण डोकावू लागतील... असं आत्ताच्या क्षणाला तरी वाटतं आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...