मुंबई/ प्रतिनिधी : लता गुठे लिखीत 'सोलमेट' या कथासंग्रहाचे व "ताऱ्यांचे जग' व 'धमाल मस्ती' या दोन दिवाळी अंकांचे प्रकाशन ज्येष्ठ कवी लेखक अशोक बागवे व मौज प्रकाशनच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर, मा. आमदार पराग अळवणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गजानन रत्नपारखी (कार्डिओलॉजिस्ट) तसेच देवेंद्र भुजबळ हे व्यासपीठावर उपस्थित होते. सोलमेट कथा संग्रहातील कथेचे अभिवाचन सुप्रसिद्ध लेखक अभिनेते प्रकाश राणे यांनी केले. भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुठे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी मागील बारा वर्षाचा साहित्य प्रवास व त्यांना आलेले अनुभव यावर अवलोकन केले तसेच या प्रवासामध्ये ज्यांची ज्यांची त्यांना मदत झाली त्यांचे आभार मानून ऋण व्यक्त केले.
लता गुठे यांचा साहित्यिक प्रवास मी जवळून पाहिला आहे. गेली १२ वर्ष अतिशय सातत्याने मेहनतीने साहित्यसेवेचे व्रत धारण करुन साहित्याची त्या सेवा करत आहेत, असे आमदार पराग अळवणी यांनी म्हटले.
मोनिका गजेंद्रगडकर यांनी त्यांच्या मनोगतातून लता गुठे यांच्या 'सोलमेट' कथासंग्रहातील कथांची वैशिष्ट्ये उलगडून दाखविताना म्हटले की, या कथा वेगळ्या जाणीवातून निर्माण झाल्या आहेत. अनेक समकालीन लेखिकांच्या स्रीवादी साहित्यातून पुरुष हे शोषित, स्त्रियांचा छळ करणारे अशीच प्रतिमा निर्माण केली जाते परंतु याला छेद देत लता गुठे यांनी स्री-पुरुष नात्यातील संबंधाची गुंफन सहज, सुंदर संवादातून पात्रांच्या मनातील घालमेल, अस्वस्थता व्यक्त होताना दिसते. अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून बर्याच कथा साकार होताना दिसतात. या संग्रहातील अनेक विषयांवरील कथा वाचताना कथेचा बाज वेगळा जाणवतो. ग्रामीण भाषेतील तसे शहरी, भाषेतील कथांमधील पात्रं वेगवेगळ्या भाषेत संवाद करतात ते वाचकांना त्या कृत्रिम वाटत नाहीत. विवेचन करताना अनेक उदाहरण देऊन मोनिका गजेंद्रगडकर यांनी गोष्ट आणि कथा यातील फरकही सहज उलगडून दाखवला.
तर अशोक बागवे यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम यांच्या रचनातील उदाहरणं देऊन साहित्याची निर्मिती सकस कशी असू शकते हे त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले. पुस्तक हातात घेऊन वाचण्यात जी गंमत आहे ती ई- बुकमध्ये नाही. पुस्तक कायमस्वरूपी संग्रही राहतात, सोबत करतात असेही ते म्हणाले. सोलमेट या कथासंग्रहावर बोलताना कथाही कशी वाचावी, फक्त संवाद न वाचता संवादामागील भाषा समजून घ्यावी असेही ते म्हणाले.. जेव्हा कथेची निर्मिती होते तेव्हा पात्र व त्यांची नावे यातूनही लेखकांना बरेच काही सुचवायचे असते. ते वाचकांनी समजून घेऊन कथा वाचायला हवी असे अशोक बागवे म्हणाले. सहज संवाद साधत प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
लता गुठे यांच्या कथां विचार करताना कथेचा आशय, विषय, मांडणी, रचना या बाबतीत कथा परिपूर्ण असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले.
सभागृहात एसीपी अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र टाईम चे उपसंपादक अशोक पानवलकर, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, कवयत्री चारुलता काळे, रविराज गंधे, लेखक गुरुनाथ तेंडुलकर, मेघना साने, एडवोकेट व्ही व्ही गुठे उपस्थित होते त्यांचेही या प्रसंगी भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुठे यांनी सत्कार केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments:
Post a Comment