मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : “तंत्रज्ञानात चांगले किंवा वाईट असे काही नसते, ते तुम्हांला अधिक शक्ती देते. या शक्तीचा वापर कसा करायचा ते मानवाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणून चांगले किंवा वाईट काय असेल तर ती मानवाची विचार करण्याची पद्धत होय." असे उद्गार नामवंत शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी नुकतेच काढले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या ८७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, "नवीन युगाला तोंड द्यायचे झाल्यास वैज्ञानिक दृष्ट्या किती प्रगती केली यापेक्षा अधिक आपण मानवाची जडणघडण कशी केली हे महत्वाचे असेल."
यावेळी डॉ. काकोडकर यांना मराठी यशवंत पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार साहित्य संघाच्या अध्यक्षा अचला जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. इतर साहित्य सेवा पुरस्कार डॉ. काकोडकर यांच्या हस्ते देण्यात आले. ते असे, शुभदा पिंगे (सहचारिणी पुरस्कार), सुचिता घोरपडे (चंद्रगिरी, ग्रामीण कथेसाठी), रमेश तांबे (बालसाहित्य), माधव सावरगांवकर (कथाकार शांताराम), डॉ. सतीश बागल (वैचारिक साहित्य), दत्ता डांगे (वि.पु. भागवत प्रकाशन पुरस्कार), चंद्रकांत कुलकर्णी (कै. के. नारायण काळे स्मृती पुरस्कार), दत्ताराम गायकर (माधव जूलियन स्मृती पुरस्कार), विद्याधर ताठे (दिगंबर परुळेकर स्मृती पुरस्कार).
प्रारंभी साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी स्वागत करताना संस्थेच्या वेगवेगळ्या कामांची माहिती दिली तर कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी मनोगतात संस्थेची प्रारंभापासूनची वाटचाल सांगितली. साहित्य दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन डॉ. काकोडकर यांनी केले. प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव यांनी आभार मानले तर प्रा. नरेंद्र पाठक आणि प्रा. प्रतिभा बिस्वास यांनी सूत्रसंचालन केले.


No comments:
Post a Comment