जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा'चे उद्घाटन !
विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत - जिल्हाधिकारी निमा अरोरा
अकोला, अखलाख देशमुख, दि. १ : विविध स्पर्धा व उपक्रमातील सहभागाने कलागुणांना झळाळी मिळते आणि व्यक्तिमत्व विकासात त्याने मोलाची मदत होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज ‘जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी केले .
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर अकोला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीच्यावतीने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितिच्या अध्यक्ष ॲड अनिता गुरव आदि उपस्थित होते.
यावेळी आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी म्हणाल्या, आजच्या या बालमहोत्सवातून यश मिळविलेले मुल-मुली क्रीडा व अन्य कलाक्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीच्यामाध्यमातून विभाग स्तर, राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडू शकतात. अशा स्पर्धा व उपक्रमांतून व्यक्तिमत्व विकासात मोलाची मदत होत असते. हा महोत्सव एक उत्तम संधी समजून यात सहभागी सर्व स्पर्धकांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा स्तरावरील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या निराधार,उन्मार्गी,एकल पालक व कोवीड महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने 'जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शुक्रवार २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता समारोप होणार असून या कार्यक्रमातच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदाण करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment