Friday 30 December 2022

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांची पांरपारीक पध्दतीने भाताची साठवणूक, नामशेष होत असलेला "कनगा" पुन्हा उजेडात !

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांची पांरपारीक पध्दतीने भाताची साठवणूक, नामशेष होत असलेला "कनगा" पुन्हा उजेडात !

कल्याण, (संजय कांबळे) : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय सुरू झाल्याने बळीराजा ची अनेक अवजारे, साहित्य जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असताना कल्याण तालुक्यातील मांजर्ली गावातील शेतकरी नकलू बारकू घारे यांनी मात्र बांबूच्या काड्यापासून 'कनगा' बनवून त्यामध्ये भाताची साठवून केली आहे. यामुळे नैसर्गिक पध्दतीने भात दिर्घकाळ टिकतात असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला हा कनगा पुन्हा उजेडात आला आहे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु आजही या देशातील शेतकरी पांरपारीक पध्दतीने शेती करतात अशी नेहमी ओरड होते,  यातून कर्ज बाजारी होऊन ते आत्महत्या करता मागील जानेवारी पासून ते आतापर्यंत जवळपास २ हजाराच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

अलिकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीच्या मागे लागले आहेत. त्यामुळे बैलजोडी च्या जागी ट्रक्टर, तसेच इतर यंत्राचा वापर वाढला आहे, तिफन, नांगर, कुदळ, विळे, खुरपे, या शेतकऱ्यांच्या पांरपारीक अवजारांची जागा आता आधुनिक यंत्रानी घेतली आहे. बेसुमार रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमीनीचा पोत खालावत चालला आहे, सेंद्रिय खतांचा वापर, सेंद्रिय शेती अत्यल्प दिसून येत आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत आहे.

राज्यातील काही भागात आजही बहुजन, आदिवासी शेतकरी पांरपारीक पध्दतीने शेती करत आहेत. नगर मधील, अकोले तालुका, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, येथे अशी शेती पाह्याला मिळते. मुंबई शहराच्या उपनगरातील शेती जवळपास संपुष्टात आली आहे. कल्याण, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ ,मुरबाड आदी तालुक्यातील काही मोजक्याच भागात शेती केली जात आहे. या परिसरात देखील भातशेती च्या जागी फार्म हाऊस, इमारती, रेस्टॉरंट, हाँटेल, अशी सिंमेट ची जंगले पसरत आहेत. यावर अजूनही कडी म्हणजे या परिसरातून अनेक एक्स्प्रेस, महामार्ग, जात आहेत, यामुळे तर शिल्लक राहिलेली शेती ही असून नसल्यासारखी झाली आहे.

अशाही परिस्थितीत कल्याण तालुक्यातील मांजर्ली गावातील शेतकरी नकलू बारकू घारे यांनी पांरपारीक पध्दतीची कास सोडलेली नाही. अगदी नांगरणी, कुळवनी, चिखलनी, पासून ते कापणी, झोडणी, हरपनी, अशी सर्व शेतीची कामे ते बैलजोडी व घरातील माणसाच्या मदतीने करतात.अगदी कापणीच्या वेळी भारे बांधण्यासाठी व प्लास्टिकच्या बंदाऐवजी चिबां-याचे बंद वापरतात, तसेच इतर शेतकरी झोडलेला भात गोण्या किंवा लोंखडी हौद याचा सर्रास वापर करतात. परंतु यांनी बांबूच्या काड्या चिरून त्यांच्या पासून कनगा बनवून त्यामध्ये भात साठवणूक केली आहे.

भात कापणी नंतर त्याची झोडणी केली जाते, यानंतर हरपनी केल्यावर ते भात गोण्या किंवा पत्र्याच्या हौदात (पेटी) ठेवले जाते, हा भात पुर्णपणे सुकलेला नसतो, अलीकडे तर वर्षभर पाऊस पडतो. यामुळे भात साठवणूक करणे अवघड असते. गोणीत किंवा पत्र्याच्या हौदात तो खराब होतो, याउलट या बांबूच्या कनग्यात त्याला नैसर्गिकरित्या वातावरण मिळते,या कनग्यामध्ये सुमारे १०/१५ क्विंटल भाताची साठवणूक करता येते. तसेच  यामुळे तो दिर्घकाळ टिकतो असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. याशिवाय आपण आपल्या ग्रामीण संस्कृती ची जोपासना करतो याचे समाधान मिळते असेही घारे यांचा विश्वास आहे.

खरेच आजच्या आधुनिकतेच्या नावाखाली चंगळवादी दुनियेत आपण आपल्या चालीरीती, पंरपरा, संस्कृती याची जोपासना करतो का?याचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या सोईनुसार देईल. परंतु कल्याण सारख्या झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या या तालुक्यातील मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे हे काम नक्कीच 'खेड्याकडे चला, म्हणायला लावणारे आहे.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...