महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन धोरण व कायदा करावा – मा. अजितदादा पवार
मुंबई, अखलाख देशमुख, दि ३१ : महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, शेतकर्यांचे प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा अशी मागणी करणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
बागेश्वर बाबा कोण आहे? त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही अजितदादा पवार यांनी यावेळी केली.
बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण लोकशाहीत काम करतो. आपल्या खंडप्राय देशात लोकशाहीला मोठे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान, घटना दिली आहे. ही घटना व संविधानाच्या चौकटीमध्ये बसणार्या ज्या बाबी असतील त्या माध्यमांनी दाखवल्या पाहिजेत, वृत्तपत्रात छापल्या पाहिजेत, लेख पण लिहिले पाहिजेत. ज्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, ज्यातून धर्मा-धर्मात तेढ निर्माण होणार आहे, जातीयद्वेष निर्माण होणार आहे, समाजासमाजात दुही निर्माण होणार आहे, अंतर पडणार आहे अशा गोष्टी आपल्या भारताला परवडणाऱ्या नाहीत, असेही अजितदादा पवार म्हणाले.
हिंडेनबर्गबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, यावर देशपातळीवर चर्चा करायला लागले आहेत. ज्या परदेशी कंपनीने आरोप केला त्यांचे म्हणणे वाचले. ज्यांच्या विरोधात केले त्या अदानी ग्रुपने देखील त्यांचे म्हणणे मांडले आहे. एक परदेशी कंपनी आणि आज भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात श्रीमंत गणली जाणारी व्यक्ती यांच्यात हे घडत असताना केंद्र सरकारच्या वित्त विभागाने हस्तक्षेप केला पाहिजे. मोठमोठ्या बँकांच्या बातम्या आल्यानंतर वित्त विभागाने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि लोकांनी घाबरून जाऊ नये असे पत्रक काढले व योग्य अयोग्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशी घटना घडत असताना का कुणीच बोलायला तयार नाही. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या यंत्रणा गप्प का आहेत. याबाबतच्या वस्तुस्थितीचा परिपूर्ण अभ्यास केंद्र सरकारचा झाला असेल तर जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणीही अजितदादा पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्या आमदारांची विधानभवनात बैठक लावली आहे. त्यात पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. चिंचवड व कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लढवण्यासाठी आम्ही ठाम आहोत, असे सांगतानाच कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड देगलूरमध्ये निवडणुका झाल्या आहेत याची आठवण अजितदादांनी करून दिली.
आताचा अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरचा दर वाढला आहे, प्रचंड महागाई वाढली आहे, यापासून केंद्र सरकारने देशातील जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामध्ये रेल्वेचा निधी मिळायला हवा. वेगवेगळ्या खात्यांचा निधी असतो तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, ही महाराष्ट्राचा नागरिक म्हणून अपेक्षा आहे, असेही अजितदादा म्हणाले.
हे सरकार गोरगरीबांचे नाही, 'सर्वसामान्यांचे... सर्वसामान्यांचे सरकार' आहे असा टोला अजितदादा पवार यांनी लगावतानाच भाजप आमदार नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. मी कामासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो त्यावेळी कॉल केल्यानंतर 'दादा देऊ काही काळजी करू नका' लवकरच देऊ..दोघेही पॉझिटिव्ह बोलतात निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे, काय आहे विचारतात, मात्र वेळ काही मिळत नाही. आम्हाला नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करत आहेत की वेळ मारुन नेतायत हे कळायला मार्ग नाही. आमचं 'सर्वसामान्यांचे सरकार' बोलतात, मात्र कुठेही महागाई कमी करण्याचे, कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत. उलट बाहेरचे मुख्यमंत्री येतात आणि इथल्या उद्योगपतींना, बॉलिवूड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना तुम्ही आमच्याकडे चला बोलत आहेत, अशी टीका अजितदादांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत १५ दिवस अगोदर बैठक मुख्यमंत्री यांनी घ्यायची असते. कुठले प्रश्न महाराष्ट्राचे असावेत याबाबत पुस्तिका काढली जाते. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुद्दामहून कुणी टाळले नाही. डॉ. अमोल कोल्हे मुंबईत होते म्हणून ते बैठकीला गेले, बाकीचे खासदार दिल्लीत होते असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, माजी खासदार व ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment