समाज एकत्र होण्यासाठी पष्टे परिवार कुलदैवतांचा देवभेट, जागर व गोंधळ !
*वृत्त संकलन: डॉ.दिपेश पष्टे (ध्यानतज्ञ व समुपदेशक)*
‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून ‘कुलदेवता’ हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हंटलय. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते. कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. बहुतेक करून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे ‘कुलदैवत’ असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाउन दर्शन घ्यावं असं म्हटल जात.
प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व पुराणात सांगितल आहे की, ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, श्रीशिव आणि श्रीगणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात.
कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जात. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंबकबिला वाढला की त्याला कुळ म्हणत असावेत. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी. कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील विजयगड, ता. वाडा येथील पष्टे परिवारातील कुळदैवतचा देवदर्शन, जागरण व गोंधळ कार्यक्रम हा २ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत आहे. यामध्ये परिवारातील तसेच कुळातील बाहेर राज्य मध्ये वास्तव्यास असलेले सर्वजण दर्शनासाठी येत असून एकत्रित राहून समाजामध्ये आपली एकजूट तसेच एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन या कार्यक्रमातून दाखवून देत असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाकडेही वेळ नसताना संपूर्ण कुळाची एकजूट दाखवून समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी एकीचे बळ तयार करून आनंदी जीवन जगण्यासाठी तयार होणाऱ्या वातावरणाचे पष्टे परिवार एक उत्तम उदाहरण निर्माण करत आहे.
No comments:
Post a Comment