Thursday 30 March 2023

लिंबू आणि सिताफळाने आणली आर्थिक समृद्धी !

लिंबू आणि सिताफळाने आणली आर्थिक समृद्धी !

अकोला, अखलाख देशमुख,  दि.30 : अथक मेहनत आणि शास्त्रीय दृष्टीकोनाचा अवलंब केल्यास शेतीसारखा फायद्याच्या व्यवसाय नाही, असे सांगतात पुनोती बु. ता. बार्शीटाकळी येथील शेतकरी गजानन मोतिराम महल्ले. महल्ले यांनी आपल्या तुलनेने हलक्या प्रतिच्या जमिनीत लिंबाची बाग केली आहे. शिवाय नुकतीच त्यांनी उर्वरित क्षेत्रात सिताफळ बाग केली आहे.  लिंबाच्या बागेतून वर्षाला  ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत असते, असे त्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या योजनांमुळे झाला लाभ___

हे सगळं त्यांना शक्य झाले ते कृषी विभागाच्या विविध योजनांमधून. लिंबाची बाग त्यांनी महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतून मिळाली. त्यात त्यांनी २ एकर ७ गुंठे क्षेत्रात  लिंबाची झाडे लावली. संपूर्ण बाग त्यांनी ठिबक खाली घेतलाय. या शिवाय त्यांनी सेंद्रीय खतांचा वापर, बागेची नीट निगा राखणे, झाडांची वेळेवर छाटणी करणे इ. उपाययोजना केल्याने आज त्यांच्या बागेतील लिंबू बाजारात प्रसिद्ध झालाय. महल्लेंचा लिंबू म्हणून हा लिंबू अकोला, कारंजा, पिंजर या ठिकाणच्या बाजारात प्रसिद्ध आहे. मोठा आकार, भरपूर रस हे त्यांच्या लिंबाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इतरांपेक्षा त्यांच्या लिंबाला भाव जास्तच मिळतो. आता तर इतकी ख्याती झाली आहे की, व्यापारी स्वतःच येऊन माल घेऊन जातात. याच कमाईतून सर्व प्रपंच आपण केला, असेही त्यांनी सांगितले. 

सिताफळ बागेची लागवड___

याच बागेच्या अनुभवातून त्यांनी सन २०२१-२२ मध्ये सिताफळाची बाग केली आहे. सिताफळ बागेसाठी त्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ मिळाला असून  सिताफळही त्यांनी ठिबकवर केले आहे. त्यांची जमिन हलकी असल्याने त्यांनी फळबाग हा पर्याय निवडला. ते स्वतः आता फलोत्पादनातील तज्ज्ञ झाले आहेत. त्यांच्या शेतावर हल्ली कृषी विभागाचे प्रक्षेत्र दौरे आयोजित करुन अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. सेंद्रीय खतांचा वापर हे ही त्यांच्या बागेचे वैशिष्ट्य. 

रोपवाटिकेचेही संवर्धन___

या शिवाय आता त्यांच्या बागेचे वृक्ष हे मातृवृक्ष म्हणून गृहित धरुन त्यांना रोपवाटिका करण्यासही प्रोत्साहन देण्यात आले आहे. रोपवाटिका करुन त्यांच्याकडील रोपे आता अन्य शेतकरी घेऊन जात असून फळबाग लागवड करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना___

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा भाग म्हणून ही योजना राबविली जाते. वैविध्यपूर्ण हवामान विभागानुसार प्रादेशिक  अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागात फलोत्पादनाला चालना दिली जाते. त्यात संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, विस्तार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा देऊन समुह पद्धतीने विकास केला जातो. यात शेतकऱ्यांचे एकत्रिकरण करणे हा महत्त्वाचा घटक आहे.  त्याद्वारे फलोत्पादनात वाढ करणे, उत्पन्नात वाढ करुन आहार विषयक सुरक्षा बळकट करण्यात येते. यात सुक्ष्म सिंचनाला चालना दिली जाते. जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती असून त्यासमितीमार्फत योजनेचा प्रसार व शेतकऱ्यांची निवड करणे आदी बाबी करण्यात येतात, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...