*शून्य कचरा मोहीम राबविण्यासाठी करण्यात आली जनजागृती*
श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई शक्तीपिठाचा बारावा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक ८ में २०२३ रोजी आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी जगदंबा माता, अबाल वृद्धांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत आणि ग्रामदैवत श्री वाघजाई मातेसह इतर देवतांची स्थापना अंदाजे ५०० वर्षापूर्वी सन १५१० ते १५१२ या काळात टेरवमध्ये करण्यात आली. हिरव्यागार देवरहाटीमध्ये वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन १८३९ साली सदर मंदिरांचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर या जुन्या लाकडी कौलारु मंदिराच्या नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करुन दिनांक ८ मे २०११ रोजी या नूतन मंदिराचे उद्घाटन व कलशारोहण श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर, यांचे शुभहस्ते आणि ह.भ.प. भारती महाराज, आळंदी देवाची यांच्या उपस्थितीत करण्यात आले. १२ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दिनांक ८ मे २०२३ रोजी सकाळी देवतांना अभ्यंगस्नान, अभिषक, नवचंडी याग, दुपारी महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ हरिपाठ व महाआरती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने सदर देवस्थानास *पर्यटनाचा *क* दर्जा तसेच *तीर्थक्षेत्राचा *ब* दर्जा बहाल केला आहे. कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे भव्यदिव्य मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी रस्ता, भव्य मंदिर, भैरी भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी आणि नवदुर्गासह इतर देवतांच्या आकर्ष मूर्ती, प्रशस्त उद्यान आणि देवरहाटीतील गारवा यामुळे या ठिकाणी पर्यटक आकर्षित होत आहेत. श्री क्षेत्र टेरव येथील श्री कुलस्वामिनी भवानी - वाघजाई मंदिर हे धार्मिक, अध्यात्मिक केंद्राबरोबरच एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.
मंदिराच्या बाराव्या वर्धापनदिनी सन्माननीय आमदार श्री शेखर निकम सर, अनेक मान्यवर तसेच माहेरवाशिणी, भाविकांनी सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
तसेच १२ व्या वर्धापनदिनी शून्य कचरा मोहीम राबवून टेरव गाव कचरामुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. शाळा, धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे प्रकार व त्याची विल्हेवाट कशी लावावी, अवैध वृक्षतोड, वणवा, वन्यप्राण्यांची शिकार, रासायनिक खते, पाण्याचा अपव्यय, थर्माकोल व प्लास्टिकचा वापर या वर इतर अनेक बाबी का व कश्या टाळाव्या या बाबत जनजागृती करण्यात आली.
सदर स्वच्छता मोहिमेची सुरुवात गावातील शाळा, धार्मिक स्थळे, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक इत्यादी जमा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावून करण्यात येणार आहे.
सौजन्य - 'ग्रामस्थ टेरव'
No comments:
Post a Comment