Thursday 29 June 2023

बकरी ईद निमित्त कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे घंटानाद आंदोलन !!

बकरी ईद निमित्त कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे घंटानाद आंदोलन !!

कल्याण, प्रतिनिधी : गुरुवारी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळीच शिंदे गट व ठाकरे गटाचे कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर जमून आंदोलन करू लागले. किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाद करत देवीची आरती कार्यकर्त्यांनी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी आधीच सतर्कतेचा उपाय म्हणून दुर्गाडी किल्ला परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेट्स लावून किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी किल्ल्याच्या बाहेरच घंटानाद आंदोलन केले.

दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. तेथे बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गादेवीच्या दर्शनास प्रतिबंध केला जातो. त्याच्या निषेधार्थ तसेच हिंदूंनाही देवीच्या दर्शनास प्रवेश दिला जावा, या मागणीसाठी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने १९८६ सालापासून दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करतानाच पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे म्हणाले, "हिंदूंवर हा जो अन्याय होतोय, तो अन्याय दूर करण्यासाठी आनंदी दिघे यांनी १९८६ साली सुरू केलेले आंदोलन आम्ही सातत्याने सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यात सहभाग आहे. त्यांना हा विषय माहीत आहे. ते हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. न्यायालयीन लढाई सुरू असल्यामुळे याला वेळ लागत आहे, मात्र आम्ही हिंदू हे सहन करणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातून आमचा लढा सुरूच राहील."

या आंदोलनात शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, मा. आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, महिला संघटिका छायाताई वाघमारे तसेच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाप्रमुख विजय साळवी, धनंजय बोडारे, शहरप्रमुख सचिन बासरे, संघटिका विजयाताई पोटे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...