कल्याण-डोंबिवलीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक !!
*शहरातील इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा*
मुंबई,, सचिन बुटाला : कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांमधील पाणी पुरवठा प्रश्न तसेच डोंबिवलीमधील विविध नागरी समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने व कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच या परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या नळजोडण्यांचा व्यास दुप्पट करणे, बुस्टर पंप बसविणे यांसह दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या संदर्भातही सविस्तर चर्चा झाली.
पाण्याचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असल्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांचे व या परिसरातील रहिवाश्यांचे खूप हाल होत आहेत, त्यामुळे या विषयावर ठोस उपाययोजना करण्यासासाठी महापालिका व एमआयडीसी स्तरावर तातडीने पावले उचलावीत अशी सूचना केली.
त्याचबरोबर बैठकीत हभप सावळाराम महाराज क्रिडा संकुल, पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि डोंबिवली जिमखाना, पलावा सिटी कर आकारणी इत्यादी विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून हे विषय सकारात्मकरित्या सोडविण्याच्या दृष्टीने निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्यासह कल्याण-डोंबिवली महागनरपालिकेचे व एमआयडीसीचे अधिकारी तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी आणि २७ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment