सावकारीच्या विळख्यात अडकले ६३ हजार शेतकरी !!
अमरावती, प्रतिनिधी ::बॅंकांचे कर्ज भरण्यास अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांवर सावकारी कर्ज घेण्याची वेळ येत आहे. जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत परवानाधारक ६०२ सावकारांनी ६३,०६३ कर्जदारांना ६७.४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
खासगी सावकारांकडील कर्जाचा आकडा त्यापेक्षा अधिक असल्याची चर्चा आहे. दागिने, प्लॉट, घर, शेती तारण ठेवून हे कर्ज घेतले जाते. त्यातच अवैध सावकारी सुध्दा जोरात सुरू आहे. त्यासाठी पाच टक्के ते दहा टक्के महिना दराने व त्यावर देखील चक्रवाढ व्याजाची आकारणी करून पैसे उकळले जातात. त्यामुळे जिल्हाभरात शेतकरी सावकारी विळख्यात अडकले आहेत.
सहकार विभागाकडे किंवा पोलिस प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केल्यास अशा सावकारांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र शेतकरी कर्जापायी पिचलेला असल्याने त्यांच्याकडून अशी हिंमत होत नाही. परिणामी खासगी सावकारांचे फावते व त्यांच्याकडून दामदुप्पट दराने वसुली होते.
No comments:
Post a Comment