कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगररचना विभागातील दोन कर्मचारी अटकेत !!
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन कर्मचाऱ्यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. नगररचना विभागातील बाळू बहिराम, राजेश बागूल अशी अटक कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बांधकाम मंजुरीसाठी आलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर असून याप्रकरणी पालिकेने तक्रार केली होती.
डोंबिवली महाराष्ट्रनगर मध्ये विनोद बिल्डर्सचे मालक विनोद म्हात्रे, रमेश म्हात्रे, वास्तुविशारद धीरज पाटील यांनी नगररचना विभागात सहा माळ्यांच्या इमारतीचा आराखडा जुलै २०२१ मध्ये मंजुरीसाठी दाखल केला होता. आराखडा दाखल करताना विनोद बिल्डर्सने भूमिअभिलेख विभागाचा बनावट मोजणी नकाशा इमारत आराखड्यासोबत सादर केला होता. या आराखड्यानुसार खासगी जमिनीलगतची गुरचरणीची सहा गुंठे जमीन खासगी मालकीची दाखविण्यात आली होती. आराखडा मंजुरीपूर्वी सर्वेअर बाळू बहिरम, आरेखक राजेश बागूल यांनी संबंधित जमिनीचा प्रत्यक्ष स्थळ सर्वे करून जमिनीचे अचूक रेखांकन करणे आवश्यक होते. मात्र विकसकाने दाखल केलेला प्रस्ताव योग्य असल्याचा शेरा देत आरोपींनी हा प्रस्ताव तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, अभियंता ज्ञानेश्वर आडके यांच्याकडे पाठविला. दरम्यान संबंधित इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर माजी नगरसेवक रमेश पद्माकर म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली. चौकशीदरम्यान भूमी अभिलेख विभागाने विनोद बिल्डर्सने पालिकेत दाखल केलेला नकाशा आम्ही दिला नसल्याचे स्पष्ट केले.
यानंतर बोगस कागदपत्रासंबंधी नगररचनाकार शशिम केदार यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात विकासक विनोद म्हात्रे, वास्तुविशारद यांच्याविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणात बाळू बहिरम व राजेश बागूल दोषी आढळल्याने बाजारपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली.
No comments:
Post a Comment