छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला हाती धनुष्यबाण असलेला अश्वारूढ पुतळा उभारणार - पालकमंत्री उदय सामंत
रायगड, प्रतिनिधी - राज्य शासनामार्फत खालापूर तालुक्यातील उंबरखिंड येथील विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला हाती धनुष्यबाण असलेला अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
उंबर खिंड संग्रामाच्या ३६३ व्या विजय दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,शिवव्याख्याते श्री. भोपी , प्रशांत देशमुख, शिवदुर्ग चे सुनील गायकवाड, उद्योग विभागाचे अध्यक्ष उदय सावंत,संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी अजीत नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी,स्थानिक सरपंच आखाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
उंबरखिंड येथील 363 वर्षांपूर्वीची प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी राजे आणि मुघल यांच्यातील लढाई आणि विजय याला इतिहासात महत्वाचे स्थान आहे. या लढाईमध्ये शिवाजीमहाराज स्वतः सहभागी झाले होते. त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात येणारे शिवाजी महाराजांचे स्मारक आगळे वेगळे असणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री सामंत म्हणाले ज्यांच्या पाठीवर बाणांचे भाते, एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात भाला, कमरेला तलवार, मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात अश्वारुढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी उभारण्यात येणार आहे.
या कामाची तात्काळ पुर्ण रुपरेषा ठरवली असून एका वर्षाच्या आत जागतिक दर्जाच्या धनुष्यधारी अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात येईल असा ठाम विश्वास मंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जगातील सर्व शिवभक्तांना अभिमान वाटावा असे हे स्मारक असेल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यशासन प्रयत्नशील राहील. या स्मारकाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.या ऐतिहासिक क्षणाचे वारसदार होण्याची संधी या निमित्ताने मिळाली असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविण्याचे काम यामाध्यमातून होणार असल्याचेही पालकमंत्री श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
आ. महेंद्र थोरवे यांनी जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी सर्वाना सामावून घेत नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
श्री उदय सावंत यांनी या स्मारकाचे नियोजन, रुपरेषा यावेळी स्पष्ट केली.
No comments:
Post a Comment