Wednesday 27 March 2024

वंचित आघाडिचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या ''एकला चलो रे, च्या भूमिकेमुळे आंबेडकर समाजामध्ये कमालीची नाराजी ?

वंचित आघाडिचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या ''एकला चलो रे, च्या भूमिकेमुळे आंबेडकर समाजामध्ये कमालीची नाराजी ?

कल्याण, (संजय कांबळे) : वंचित बहुजन आघाडिचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी अगदी शेवटच्या क्षणी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीशी फारकत घेऊन 'एकला चलो रे, ची भूमिका घेत काही उमेदवारी देखील जाहीर केली, मात्र हा निर्णय समाजाला अजिबात रुचलेला नसून या वेगळ्या भूमिकेचा कळत नकळत भाजपालाच फायदा होणार असल्याची भावना आंबेडकरी जनतेमध्ये पसरली आहे, त्यामुळे आपल्या नेत्यांनी निर्णय बदलावा अशीच इच्छा अनेकांनी बोलून दाखविली तर या हट्टी विचारधारेमुळे बहुजनांची मते वंचित पासून दूर जाऊ शकतात अशी शक्यता जानकारांनी व्यक्त केली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत आतापर्यंत दुर्लक्षित केलेल्या वंचित बहुजन आघाडीने तब्बल २४ लाखाच्या वर मतदान घेतले, हे प्रमाण होते ४.६ टक्के, त्यामुळे वंचितचे एकही उमेदवार निवडून आले नसले तरी याचा जबर फटका काँग्रेस व इतर पक्षाला बसला, मात्र याचा फायदा भाजपाला झाला, भाजपा हा जातीयवादी पक्ष म्हणून आंबेडकर समाजाने कधीही या पक्षाला मतदान केले नाही व करणार नाही, हे ओळखून आता २०२४ चा लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे इतके वंचितला महत्त्व प्राप्त झाले, याचा परिणाम म्हणून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचित आघाडीशी युती केली, यामुळे भिमशक्ती व शिवशक्ती एकत्र येणार असल्याने बहुजन समाजामध्ये कमालीचा उत्साह वाढला, वंचित चे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभाना लाखोंची उपस्थिती होऊ लागली, भाजपा हा भारतीय संविधान बदलू पाहतो आहे, याला गाढून टाका असे अवाहन आंबेडकर यांनी केले, या सर्वांचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीने आंबेडकर यांना आघाडीत घेतले, त्यामुळे आपला नेता सेत्तेत येणार, बहुजनांचा आवाज लोकसभेत घुमणार अशी आशा समाजाला वाटू लागली, यामुळे गावागावात वंचित चे कार्यकर्ते कामाला लागले, आत्तापर्यंतची रस्त्यावरील लढाई आपले नेते आता संसदेत लढणार अशी प्रतिमा तयार होत असतानाच काही जागावरुन आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत 'एकला चलो रे' चा निर्णय घेतला, आणि समाजाला धक्काच बसला,
कारण आपण कितीही ताकद लावली तरी आपली कुवत काय आहे? हे तळागाळातील कार्यकर्ता जाणून आहे, आजही समाजावर अनंत अत्याचार होत आहेत, तरुणांचा खून होत आहे, बलात्कार, विनयभंग, हे नित्याचेच झाले आहे, अश्या वेळी आपण सत्तेत सहभागी असणे किती आवश्यक आहे हे सर्वांना माहिती आहे, मात्र येथे वेगळेच चित्र दिसत आहे,
अगोदरच वंचित ही भाजपाची ''बी, टिम आहे असे आरोप होत आहेत, अश्या वेळी अँड आंबेडकर यांचा हा निर्णय संशय निर्माण करणारा वाटतो, त्यामुळे समाजामध्ये कमालीचा असंतोष व नाराजी पसरली आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलणाऱ्या 'मोदींना, हरविणे हे एकच लक्ष्य असताना अमुक इतक्या जागाचा हट्टाहास कशासाठी? असा प्रश्न बहुजनांना पडला आहे, या बाबतीत कल्याण तालुक्यातील संजय भालेराव यांनी नेते अँड प्रकाश आंबेडकर यांना २ पत्रे पाठविली आहेत, शिवाय अजून खुले पत्र ते लिहून समाजाची मागणी ते त्यांच्या पर्यत पोहचविणार आहेत, अशीच भावना संपूर्ण समाजाची आहे.

बाळासाहेब आंबेडकर हे संपुर्ण देशातील एक स्वाभिमानी नेते आहेत हे कुणीच नाकारू शकत नाही आघाडीत सहभागी झाल्याने महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडवून देईल अशी मोठी अपेक्षा समाज धरून होता अनेक वेळा बाळासाहेब आणि आघाडीचे नेते यांच्या  भेटी आणि चर्चा घडवून येत होत्या त्यामुळे यावेळेस एक वेगळे चित्र घडू शकते याची  समाज चातकासारखी वाट पाहत होता.अशा वेळी आपण समाजाला धक्का दिला,

यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे आपण आठ उमेदवार  ठरवले आहेत, बाकी इतर ठिकाणी समाजाने कुणाला मतदान करावे?

२०१९ ला भिवंडी लोकसभा अरुण सावंत हे लढले तेव्हा त्यांना ४३ हजार पर्यंत मतदान झाले हे मतदान फक्त नि फक्त आंबेडकरी समाजातील होते आता ते आपल्या बदललेल्या भूमिकेमुळे वंचित ला मिळेल का? असे असते अनेक प्रश्न समाजातील लोकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे जातीयवादी पक्षाला रोखायचे असेल तर अँड. आंबेडकर यांनी आपला 'एकला चलो रे, चा निर्णय मागे घ्यावा व यावेळी समाजाचे ऐकावे अशीच इच्छा सर्वांची आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...