एक रुपयात पीक विमा शेतकरी नोंदणीला दि.31 जुलै पर्यंत मुदतवाढ !!
रायगड, प्रतिनिधी :- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करीता शेतकरी नोंदणी करिता दि.15 जुलै अंतिम तारीख होती. परंतु आता एक रुपयात पीक विमा शेतकरी नोंदणीला दि.31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ
देण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक, ठाणे अंकुश माने यांनी दिली आहे.
योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण मिळणार आहे.
ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.
ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु.51 हजार 760, रत्नागिरी जिल्ह्यासाठी भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु.50 हजार. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु.20 हजार, पालघर जिल्ह्यासाठी उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु.25 हजार.
ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामिंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तीचा अधीन राहून निश्चित केली जाईल. या योजनेंतर्गत भातासाठी केवळ 1 रुपयात जवळजवळ रु.50 हजार पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक, ठाणे अंकुश माने यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment