काडवलीची तनया महाडिक सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
चिपळूण काडवली पाचघर वाडीतील मध्यम वर्गीय कुटुंबातील कन्या कुमारी तनया गणपतराव महाडिक ही सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षा उत्तम गुण मिळवून वयाच्या २४व्या वर्षी उत्तीर्ण झाली. सेंट मेरी कॉन्व्हेन्ट हायस्कूल मुलुंड येथून ९१.०० टक्के गुण प्राप्त करून दहावी तर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथून बारावी परीक्षेत ८६.०० टक्के गुण प्राप्त करून कु. तनया उत्तीर्ण झाली, तर ए ग्रेड मिळवून तीने बी. कॉम. पदवी प्राप्त केली. तसेच कु.तनायाने सी.ए.एफ.सी., इंटर, सी.ए.फायनल परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून अतिशय कठीण म्हणून समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात सी.ए.होण्याचा तिचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
कुलस्वामिनी आई भैरी भवानी व चारगावचे ग्रामदैवत देवी रामवरदायिनी यांची कृपा व आईवडिलांचे आशीर्वाद तसेच कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य, अथक प्रयत्नांमुळे कु. तनयाने हे यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत काडवली, नातेवाईक आणि मित्र मंडळीने सी. ए. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल कु.तनयाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment