कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेवर दिंडी !
ठाणे दि.९ जुलै - ठाणे महानगरपालिकेची कायमस्वरूपी बारामाही आणि सतत नियमितपणे चालणारी कामे कंत्राटी कामगारांच्या कडून करून घेतली जातात. मात्र वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन आणि अन्य कायदेशीर सोयी सुविधा देताना ठेकेदार लबाडी करतात. महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प राहून ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याने सर्व विभागातील कंत्राटी कामगार ( सफाई कामगार, वाहनचालक, वाल्वमेन ई. ) मिळून श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त श्री सौरव राव यांना साकडे घालणार आहेत. या वेळी विविध प्रमुख मागण्यांबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरण्यात येईल.
१) आत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरुपाची बारामाही सतत चालणारी कामे करणार्या कंत्राटी कामगारांना कायम कामगारां प्रमाणे वेतन, भत्ते व सोयी सुविधा लागु करा.
२) ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना उपदान (Gratuity) ची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. कंत्राटी कामगारांना मृत्यु किंवा वयोमानानुसार कामावरुन कमी केल्यानंतर उपदानची रक्कम एका महीण्याच्या आत अदा करा.
३) शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना दरमहा २६ दिवसाचे वेतन, मे महिना, दिवाळीच्या सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात काम द्या / वेतन द्या.
४) प्रत्येक कंत्राटी कामगारांना नियमितपणे वेळेवर कायदेशीर वेतन, गणवेश, ओळखपत्र, वेतनस्लिप, सुरक्षिततेची साधणे, पावसाळी रेनशूट, गमबूट आदी वाटप करा.
५) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर कामगारांना सुट्टी किंवा जादा कामाचा भत्ता मासिक वेतनात अदा करा.
६)कायमस्वरुपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पध्दत बंद करुन सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घ्यावे. किंवा कायम स्वरुपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागु करा.
जगदीश खैरालिया, (महासचिव – श्रमिक जनता संघ), अजय भोसले (कार्यकारी सचिव, सुनील दिवेकर, संतोष देशमुख, स्वाती देशमुख, अर्चना पवार (शिक्षण विभाग), भास्कर शिगवण (रस्ते सफाई), गणेश चव्हाण (पाणी पुरवठा विभाग) सूरज वाल्मिकी (आदी कार्यकर्त्यांनी कामगारांना मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment