Saturday 31 August 2024

पालकमंत्री सफाई कर्मचारी आंदोलनाबाबत सकारात्मक, जिल्हाधिकाऱ्यांचे मनोरुग्णालय प्रशासनास आदेश !!

पालकमंत्री सफाई कर्मचारी आंदोलनाबाबत सकारात्मक, जिल्हाधिकाऱ्यांचे मनोरुग्णालय प्रशासनास आदेश !!

ठाणे, दि. ३१,

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कामगारांनी उपोषणाच्या अठराव्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे प्रदर्शन करुन किमानवेतन व गेल्या ५ वर्षाची थकबाकी रक्कम त्वरीत अदा करा या मागण्या जोरदारपणे मांडल्या. या वेळी ठाण्याचे पालक मंत्री मा. शंभुराज देसाई यांनी कामगारांना धरणेस्थळी भेट देउन त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. या बद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घालून देण्याचे आश्वासन त्यावेळी त्यांनी कामगारांना दिले. न्यायालयाने आदेश देऊनही अजून कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने १३ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.

धरणे प्रदर्शनाच्यावेळी कामगारांचे शिष्टमंडळ ठाण्याचे जिल्हाधिकारी मा. अशोक शिंगारे यांना भेटले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिली. या वेळी कामगारांचे प्रश्न ऐकून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांना फोन करुन सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन अधिनियमानुसार मिळणारे वेतन लगेच अदा करण्याचे आदेश दिले, त्याच प्रमाणे कामगारांना पीएफ आणि ESIC ची सुविधा लगेच उपलब्ध करुन द्या असेही सांगितले. तसेच जॉइंट डायरेक्टर मार्फत या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. टेंडर मध्ये काहीही ठरवले असले तरी किमान वेतन कायद्या नुसार वेतन अदा कारणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले. शिष्टमंडळात श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, सचिव सुनील कंद, कामगार प्रतिनिधी अनिता कुमावत, सोनी चौहान, दीनानाथ देसले, संजय सेंदाणे, महेश निचिते आदी होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश आंदोलक सफाई कामगारांच्या दृष्टीने दिलासादायक आहेत, पण ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी किमान वेतन अदा करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही रुग्णालय प्रशासन आणि कंत्राटदार त्याची अंमल बजावणी अजून करत नाही. १३ ऑगस्ट पासून सुरु असलेले या सफाई कामगारांच्या साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी जुलै महिन्याचे वेतन किमान वेतन कायद्यानुसार देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु रुग्णालय प्रशासनाने ते पाळलेले नाही. त्यामुळे मागण्या प्रत्यक्षात पदरात पडल्याशिवाय उपोषण आंदोलन मागे घेणार नसल्याचे श्रमिक जनता संघ यूनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले. 

या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी श्रमिक जनता संघाचे उपाध्यक्ष डॉ. संजय. मं. गो, खजिनदार अविनाश नाईक, कल्याणचे घंटागाडीचे सफाई कामगार सदस्य तसेच राष्ट्र सेवा दलाचे साथी जवाहर नगोरी, समता विचार प्रसारक संस्थेच्या कोषाध्यक्ष मीनल उत्तूरकर, घर बचाओ आंदोलनाचे संतोष थोरात, सुनिल दिवेकर, अजय भोसले, लोक कामगार संघाचे कार्यकर्ते गिरीश भावे, धर्मराज पक्षाचे सचिव नितीन देशपांडे, बहुजन विकास संघ नरेश भगवाने, नरेश बोहित, रस्ते साफसफाई विभाग चे भास्कर शिगवण, पाणी पुरवठा विभाग चे गणेश चव्हाण, घंटा गाडी सचिन कर्डिले, मनोरुग्णालयातील अनिता कुमावत, शर्मिला लोगडे, सोनी चव्हाण, दिनानाथ देसले, संजय सैदाणे, व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जगदीश खैरालिया 
महासचिव, श्रमिक जनता संघ  
9769287233

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...