Friday 9 August 2024

ट्रान्सजेंडर हेल्प डेस्कचे पुणे येथे लोकार्पण !!

ट्रान्सजेंडर हेल्प डेस्कचे पुणे येथे लोकार्पण !!

** सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी अँड रिसर्चचा पुढाकार

पुणे, दि. ९: क्रांती दिनाचे औचित्य साधून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय पुणे आणि सेंटर फॉर ॲडव्होकसी अँड रिसर्च यांच्या पुढाकारातून निर्मित राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर हेल्प-डेस्कचे लोकार्पण करण्यात आले. 

विशाल लोंढे, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे आणि ट्रान्सजेंडर प्रतिनिधींच्या हस्ते या हेल्प-डेस्कचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे या हेल्प-डेस्कची निर्मिती करण्यात आली आहे. शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना व आरोग्यविषयक योजना आणि त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पारलिंगी (ट्रान्सजेंडर) नागरिकांना एकाच छताखाली सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. 

याप्रसंगी सेंटर फॉर अॅड्व्होकसी अँड रिसर्चचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक आनंद बाखडे यांनी सांगितले, महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी एक बोर्ड असावे यासाठी सिफारसह अनेकांनी पुढाकार घेतला व त्यातून ट्रान्सजेंडर बोर्डाची निर्मिती झाली. याचा पुढचा टप्पा म्हणजे हे हेल्प-डेस्क आहे. 

सहायक आयुक्त श्री. लोंढे म्हणाले, ट्रान्सजेंडर नागरिकांसोबतचा भेदभाव रोखणे यासाठी प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न करायला हवा. हेल्पडेस्क ची निर्मिती हे त्यासाठीचे महत्वाचे पाऊल आमच्या विभागाच्यावतीने उचलले आहे. अधिकाधिक ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळखपत्र मिळवून देण्यासाठी व त्या माध्यमातून त्यांना विविध शासकीय विभागांच्या योजना मिळवून देण्यासाठी हेल्प-डेस्कच्या माध्यमातून समन्वय साधला जाईल. 

या हेल्पडेस्कमध्ये शुभांगी चौघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदत व मार्गदर्शन मिळवण्यासाठी या हेल्पडेस्कचा हेल्पलाईन नबंर ९१५६८८८३६० जारी करण्यात आलेला आहे.

सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट एजन्सीचे प्रितेश कांबळे म्हणाले, ट्रान्सजेंडर समुहासाठी उपजीविकेच्या अनुषंगाने प्रयत्न सामाजिक संस्था करतात. त्यासोबत त्यांना अधिकार आधारित विविध कागदपत्रे व योजना मिळवण्यात या डेस्कचा मोठा वाटा असेल.

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उप समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे म्हणाले, महानगरपालिकेने ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी ५ योजना सुरू केलेल्या आहेत. तसेच या हेल्प-डेस्कसाठी आवश्यक ती मदत पुणे करेल.  

याप्रसंगी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोखंडे, पुणे मनपाचे समाज सेवक संदिप कांबळे, जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंटचे जॉर्ज स्वामी, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या ऐश्वर्या पांडव, आशिका पुणेकर, मोनिका पुणेकर यांच्यासह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी व सेंटर फॉर अॅड्व्होकसी अँड रिसर्च चे कार्यकर्ते, ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कादंबरी शेख, प्रतिनिधी, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट- ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी एक हेल्पडेस्क असावे अशी आमची अनेक दिवसांची मागणी होती. आज हे हेल्पडेस्क सुरू झाले याबद्दल विभागाचे आभार मानते. जिल्ह्यातील 5 हजाराहून अधिक तृतीयपंथी नागरिकांना या हेल्प-डेस्क ची मदत होईल. 

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...