Wednesday, 15 January 2025

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणार्या  व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व विविध ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ७ वर्षे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती हे पुरस्कार दिले जातात. सन २०२४चे हे तिन्ही पुरस्कार संस्थेच्या विश्वास्त मंडळाच्या बैठकीत एकमताने देण्याचा निर्णय घेण्यात आला.

1) *समाजव्रती पुरस्कार* : 
मुंब्रा, ठाणे येथे 'परचम कलेक्टीव्ह' या मुलींना फूटबॉल खेळण्यासाठी मैदान मिळावे यासाठी असाधारण चळवळ यशस्वीपणे चालवणाऱ्या गटाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या फरहत जहाँ अली यांना या वर्षीचा समाजव्रती पुरस्कार मिळाला आहे. फरहत यांनी गेली पंचवीस वर्षे मुस्लीम स्त्रियांच्या हक्कांसाठी काम केले आहे. 'परचम'च्या आधी 'आवाज ए निस्वाँ', 'मजलिस' या स्त्रीविषयक आणि कायदेविषयक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेकडो स्त्रियांचे समुपदेशन केलेले आहे, त्यांचे व्यक्तिगत प्रश्न सोडवताना मारहाण करणाऱ्या कैक हिंसक नवऱ्यांना, त्यांच्या कुटुंबांना, शेकडो पोलिसांना, मुल्ला-मौलवींना त्या सामोऱ्या गेल्या आहेत. या प्राय: कुटुंब कायदेविषयक कामाला त्यांनी लहान मुलींवरील लैंगिक व शारीरिक अत्याचारांचे प्रश्न पुढे आणण्याची महत्त्वपूर्ण जोड मिळवून दिली. पॉक्सो कायद्याच्या संदर्भात समुपदेशन, अत्याचार झालेल्या बालिकांचे खटले उभे राहाण्यासाठी लागणारे कायदेशीर, आर्थिक व मानसिक साहाय्य, त्यांचे व कुटुंबियांचे मनोधैर्य वाढण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करून मुलींना व कुटुंबियांना लढायला ताकद देण्याचे प्रयत्न त्यांनी अत्यंत चिकाटीने केले आहेत.

2) *शिक्षणव्रती पुरस्कार* : 
अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतानाच विद्यार्थी चळवळीत अमित नारकर यांनी पाऊल टाकले आणि तेव्हापासून आजतागायत सातत्याने वंचित शोषित गटांच्या हित संवर्धनासाठी आणि हक्क रक्षणासाठी संशोधक, कार्यकर्ते या भूमिकातून व्यापक लोकशिक्षणाचे काम केले आहे. लोकशिक्षणाचे हे सातत्यपूर्ण काम लक्षात घेऊन नारकर यांना या वर्षीचा शिक्षणव्रती पुरस्कार मिळाला आहे. विकास आणि सुशासन प्रक्रियेत परिघावरील जनसमूहांच्या दृष्टीतून हस्तक्षेप करण्यासाठी धोरण वकिलीचे महत्त्वपूर्ण काम नारकर यांनी केले आहे.  महाराष्ट्रातील परिवर्तनशील चळवळीतील कार्यकर्त्यांना संशोधन, प्रशिक्षण व अभ्यासपूर्ण साहित्याच्या माध्यमातून वैचारिक रसद पुरवणाऱ्या शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय या संस्थेचे ते विश्वस्त सचिव आहेत. भारत ज्ञान विज्ञान समुदाय (समिती) मध्ये साक्षरता व विज्ञानप्रसारासाठी त्यांनी केलेले काम पथदर्शी आहे.

3) *कार्यव्रती पुरस्कार* : 
'सोहम ट्रस्ट'च्या माध्यमातून काम करताना पुणे शहरातील 'भिकाऱ्यांचे डॉक्टर' ही ओळख सार्थ अभिमानाने मिरवणारे डॉ. अभिजित सोनावणे यांना कार्यव्रती पुरस्कार मिळाला आहे. डॉ. सोनावणे यांनी गेली बारा पंधरा वर्षे अक्षरश: रस्ते आणि फुटपाथवर आपला दवाखाना चालवला आहे. मंदिर असो, मशीद असो, गिरिजाघर असो नाहीतर दर्गा असो, दिवसाला तीन-चार प्रार्थनास्थळे गाठून तेथे जमलेल्या भिकाऱ्यांच्या आरोग्याच्या जटीलातील जटील समस्या हाताळणारे डॉक्टर कधी त्या भिकाऱ्यांचे सर्वार्थाने 'पालनकर्ते' झाले हे त्यांनाही कळले नाही. बघता बघत आज डॉक्टरांचे कुटुंब ११०० सदस्यांचे झाले आहे! भिकाऱ्यांना सर्व प्रकारची मदत करणारे डॉक्टर तरुण आणि बाल भिकाऱ्यांना मात्र अजिबात मदत करत नाहीत, उलटपक्षी असे जे कुणी आढळतील, त्यांना भिक मागणे सोडायला लावून अन्य व्यवसायांकडे वळवण्याचे अत्यंत अवघड कार्य ते यथाशक्ती करत असतात. 

हे पुरस्कार रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे होणार असून ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि दक्षिणायन सांस्कृतिक चळवळीचे उद्गाते डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. 
वी नीड यू सोसायटी ही संस्था १९८६ पासून ठाणे व नवी मुंबई परिसरात काम करत आहे. या कामाचा परीघ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व प्रबोधन असा आहे. यासाठी बालवाडी, प्राथमिक शिक्षणात उमंग वर्ग, कॉम्प्युटर आधारित गणित शिक्षण, ब्युटीशीयन व शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लोकशिक्षण होण्यासाठी नियमित व्याख्याने, चर्चासत्रे व शिबिरे आदी प्रबोधन कार्यक्रम केले जातात.

ठाणे शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वी नीड यू सोसायटीचे अध्यक्ष अतुल गोरे यांनी तसेच सर्व विश्वास्त मंडळाने केले आहे.

सौजन्य - अभय कांता,‌ सचिव 
*वी नीड यू सोसायटी*

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...