कल्याण पूर्व येथे सिमेंट मिस्कर ट्रकचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघाताची आमदार सुलभाताई गायकवाड यांनी घटनास्थळी केली पाहाणी !
** घटनेची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच जबाबदार व्यक्तींवर कारवाई मागणी
कल्याण, ८ मार्च २०२५: कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर आज दुपारी एक भीषण अपघात झाला. सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने टेम्पो व रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून गंभीर जखमी झाला. तसेच, इतर दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच माननीय आमदार सौ. सुलभाताई गणपत गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करून त्यांच्या उपचारांविषयी चौकशी केली. सद्यस्थितीत दोन जखमी चैतन्य रुग्णालयात, तर तीन जण अमेय रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना गंभीर दुखापती झाल्या असून, योग्य वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
सतत घडणाऱ्या अशा अपघातांमुळे वाहतूक पोलिसांनी पुणा लिंक रोड परिसरात विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार गायकवाड यांनी केली. विशेषतः विजयनगर परिसरातील उताराच्या रस्त्यावर दोन मोठ्या शाळा – ज्ञानमंदिर व सम्राट स्कूल – असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या उताराची पाहणी करून योग्य उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडे पत्र देण्याचा निर्णय आमदार गायकवाड यांनी घेतला आहे.
याशिवाय, या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
No comments:
Post a Comment