समता पंधरवड्यानिमित्त जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ |
पुणे, प्रतिनिधी : समता पंधरवड्यानिमित्त शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या; परंतु, मुदत संपूणही जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज न दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या व आता सीइटी, जेईई, नीट आदी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारदशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच पदवीनंतर एम.बी.ए. एम.सी.ए. एल.एल.बी. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. त्याकरीता ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल केले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही मुदतवाढ दिली आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://ccvis.barti.in किंवा https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन त्याची मूळ प्रत (हार्ड कॉपी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, आळंदी रोड, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या ठिकाणी ३० एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणेचे सदस्य संजय दाणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment