बी.एल.ओ. डयुटीवर नियुक्त आणि निवडणूक कार्यालयात कार्यरत अतिरिक्त शिक्षकांना उन्हाळयाची सुट्टी जाहीर करावी !
** श्री.तानाजी कांबळे, अध्यक्ष - महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यांची मा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मुंबई शहर निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती. शिवनंदा लंगडापुरे यांना निवेदन देताना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना पदाधिकारी श्री.अमित कारंडे सर
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिनांक ०२ मे २०२५ पासून १५ जून २०२५ पर्यंत उन्हाळयाची सुट्टी शासनाने जाहीर केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना सदरहू उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी निवडणूक कार्यालयात बी एल ओ पदावर कार्यरत आहेत. विदयार्थीसंख्येअभावी अतिरिक्त झाल्याने अनेक शिक्षक निवडणूक कार्यालयात बी. एल. ओ. तसेच इतर कार्यालयीन पदावर कामकाज करीत आहेत. आपण वेळोवेळी दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे अतिरिक्त शिक्षक बांधव पार पाडीत असल्याची माहिती संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख श्री युवराज कलशेट्टी यांनी दिली.
मे महिन्याच्या काळात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टया असल्याने अनेक शिक्षक आपल्या कुटुंबियांसोबत मूळगावी जात असतात. काही कौंटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन ही याच सुट्टीच्या कालावधीत केले जाते. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी - जाहीर करण्यात आली आहे. मात्र निवडणूक कार्यालयात बी एल ओ आणि इतर पदांवर कार्यरत अतिरिक्त शिक्षकांना निवडणूक कार्यालयाने उन्हाळयाची सुट्टी जाहीर केलेली नाही. निवडणूक कार्यालयात कार्यरत अतिरिक्त शिक्षकांना /बी एल ओ डयुटीवर नियुक्त शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी देण्यात यावी आणि मा. मतदान नोंदणी अधिकारी १५२ ते १८७ विधानसभा मतदारसं यांना कार्यवाही करणेबाबत सूचित करण्यात यावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष श्री तानाजी कांबळे यांनी केली आहे. याबाबत मागणी निवेदन मा. मुख्य निवडणूक अधिकारी, मा. जिल्हाधिकारी मुंबई शहर जिल्हा मा. जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा, मा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा यांना पाठविण्यात आले.
No comments:
Post a Comment