उत्कर्ष महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान !
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
मुंबईतील कॉलेजच्या गर्दीत आपले स्वतःचे वेगळेपण कायम सिद्ध करणाऱ्या आणि सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी एप्रिल महिन्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प म्हणून 'सर्वंकष विकास व अर्थप्राप्तीसाठी भाषेचे योगदान' या विषयावर विस्तृतपणे प्रकाश टाकणारे प्रा. संदीप संजय जाधव यांचे व्याख्यान पार पडले.
भाषा ही मानवाला मिळालेली एक अनमोल भेट आहे. तिच्या मदतीने लोक एकमेकांशी जोडले जातात आणि संवाद साधतात. संवादासाठी बोलणे, लिहिणे, वाचणे, हावभाव, इशारे किंवा मूक अभिनय अशी अनेक साधने वापरली जातात, पण भाषा हे त्यातले सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आपले विचार, भावना, मते आणि अनुभव व्यक्त करण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. याचा वापर जाहिरात, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन, संवाद लेखन, वृत्तनिवेदन, रेडिओ जॉकी अशा अनेक क्षेत्रात कसा करता येतो याची मुद्देसूद माहिती जाधव यांनी आपल्या व्याखानातून दिली. व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.
व्याखानाच्या सुरुवातीला प्रा. संदीप जाधव यांचे प्राचार्या मुग्धा लेले यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे उपप्राचार्य रमेश पाटील आणि उपप्राचार्या हेमा पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सर्व कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिकेत सूर्यवंशी तर सांस्कृतिक विभागप्रमुख खोडीदास गोहील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रा. राजदेव यादव यांचे 'आधुनिक तंत्रज्ञान' या विषयावर व्याख्यान येत्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
No comments:
Post a Comment