उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न !
विरार, पंकज चव्हाण : विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या शेवटी वर्षभर शैक्षणिक उत्तम कार्य, जिल्हा तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभ शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून प्रा. स्वाती जयकर, डॉ. महेंद्र घरत, डॉ. महादेव इरकर ह्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वसई विरार जिल्हा क्रीडा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. योगेश चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. संशोधन क्षेत्रात डिस्प्ले टेक्नॉलॉजी पेटंटबद्दल प्रा. अवधूत अमृते आणि आंतरराष्ट्रीय पेपर प्रसिद्धीबद्दल डॉ. शुभम पाटील या शिक्षकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव करण्यात आला.
ह्या समारंभासाठी प्राचार्या मुग्धा लेले उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित उपप्राचार्य रमेश पाटील आणि हेमा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनघा तुळजापूरकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अनिकेत सूर्यवंशी आणि प्रा. संदीप जाधव तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख खोडीदास गोहील यांच्या वतीने मानण्यात आले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शिका कल्पना राऊत आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment