मोहने येथील विजय मोरे आत्महत्या प्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल !!
*व्याजाच्या पैशासाठी घरी जाऊन केली होती शिवीगाळ*
कल्याण, संदीप शेंडगे : मोहने परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या विजय मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. मयत विजय मोरे यांच्या भावाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सचिन दळवी व एका महिला सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन दळवी या सावकाराने विजय मोरे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण व शिवीगाळ केली होती, असा आरोप मयत विजयची पत्नी व भाऊ राजू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मोरे यांनी काही दिवसांपूर्वी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घरी येऊन शिवीगाळ करणाऱ्या सावकारावर संशय व्यक्त केला होता. विशेषतः विजय मोरे यांचे भाऊ राजू मोरे यांनी खडकपाडा पोलिसात सातत्याने जाऊन पाठपुरावा करून तक्रार दाखल केली. आपल्या तक्रारीत राजू मोरे यांनी मिलिंद नगर येथील सचिन दळवी आणि एका महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हा सावकार अवाजवी व्याज आकारून जबरदस्तीने माझ्या भावाकडून पैशाची वसुली करत होता. आत्महत्या करण्याच्या चार दिवसापूर्वी सावकार आणि घरी येऊन शिवीगाळ तसेच मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी सावकाराच्या दबावामुळे विजय मोरे यांनी आत्महत्या केली असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
राजू मोरे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. प्राथमिक तपासात कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित सावकार व महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात मारहाण, शिवीगाळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे कल्याण-मोहने परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांपासून या भागातील नागरिक सावकारांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी करत होते. विजय मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे आता या सावकारांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घस्ते मॅडम करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे. विजय मोरे यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मोहने शहर अध्यक्ष माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment