पत्रकार भीमराव धुळप यांची यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी निवड !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
सामाजिक बांधिलकी असलेले धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार श्री. भीमराव धुळप यांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशनतर्फे पत्रकारिता आणि समाजसेवेसाठी दिला जाणारा सन २०२५ चा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय सावंत यांनी नुकतीच या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२५ रोजी नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.भीमराव धुळप यांनी गेल्या दोन दशकांपासून विविध सामाजिक, आरोग्यविषयक, आणि शैक्षणिक विषयांवर लेखन आणि जनजागृती केली असून, "धगधगती मुंबई" या लोकप्रिय वाचकप्रिय वर्तमानपत्राचे संपादन करताना त्यांनी असंख्य सामान्य माणसांच्या समस्या प्रकाशझोतात आणल्या आहेत. त्यांना याआधी २०१६ साली युवा संघर्ष प्रतिष्ठान, गुढे पाचगणी (शिराळा) यांच्या वतीने पहिला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ते आतापर्यंत २१ राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला आहे. अलीकडेच त्यांना संत रोहिदास मित्र मंडळ, घोगाव या त्यांच्या जन्मगावी समाजाच्या वतीने समाजभिमुख कार्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला होता.
२०२५ सालातील हा त्यांचा दुसरा पुरस्कार ठरतो आहे.यशवंतराव चव्हाण फाउंडेशन ही संस्था मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे प्रसिद्ध आहे. संस्थेने त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान बहाल केला आहे.या पुरस्कारामुळे पत्रकार भीमराव धुळप यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, विविध पत्रकार संघटना, सामाजिक संस्था आणि साहित्यिक क्षेत्रातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment