करंजा रेवस रेड्डी महामार्ग काम बंद यावर जनता ठाम !
** अगोदर नुकसान भरपाई नंतरच काम सुरु करण्याची ग्रामपंचायतची व ग्रामस्थांची मागणी.
उरण, दि २८, (विठ्ठल ममताबादे) :
दिनांक २८ जून २०२५ रोजी चाणजे ग्राम पंचायत कार्यालय करंजा, ता.उरण येथे प्रशासनाचे अधिकारी, करंजा गावांतील सात पाडे व ग्रामपंचायत हद्दीतील बाधित शेतकरी व मच्छीमार यांची बैठक संपन्न झाली. करंजा रेवस रेड्डी महामार्गावरील पुलाचे सुरू केलेले काम ग्रामस्थ व महिलां यांनी बंद पाडले आहे. ते काम सुरू होण्याचे दृष्टिकोनातून तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र मिसाळ, MSRDS चे कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध बोराडे तसेच चिफ इंजिनिअर यांचे उपस्थितीत त्यांचे आग्रहास्तव सरपंच अजय म्हात्रे यांनी मिटिंग बोलावली होती. सदर वेळी उपसरपंच श्रीमती कल्पना पाटील, माजी सभापती ऍड.सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, ऍड वेदांत नाखवा, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते. सरपंचासह सर्वजण अगोदर नुकसान भरपाई नंतरच काम सुरू यावर ठाम राहिले.
कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नंतरच काम सुरु करा अशी भूमिका बैठकीत ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी घेतली. मात्र या बैठकीत सुद्धा कोणताही सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. शासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने मागण्या मान्य न केल्याने ग्रामस्थ, मच्छिमार बांधव नाराज झाले. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.त्यामुळे तहसीलदार उद्धव कदम, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मिटींग आटोपती घेतली. शेवटी सरपंचानी आवाहन केले की आपली अशीच एकजूट कायम ठेऊन अन्याया विरोधात लढा आणखी तिव्र करुन आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत राहू. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही हा लढा असाच सुरु राहिल अशी आक्रमक भूमिका सरपंच यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी घेतली.
No comments:
Post a Comment