मैत्री सहयोग फाउंडेशनचा उपक्रम: घोगाव येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मैत्री सहयोग फाउंडेशन, येळगाव या संस्थेने २५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या १९९५-९६ मधील दहावीच्या बॅचच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचा निर्धार केला असून, त्याअंतर्गत कराड दक्षिणमधील येळगाव गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मौजे घोगाव (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असे पॅड, पेन्सिल बॉक्स व इतर साहित्य देण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मुळीक यांच्यासह त्यांच्या टीमने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमास घोगाव येथील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रतिष्ठित नागरिक शंकर हरी पाटील, सरपंच सौ. मिनाक्षी साळुंखे, उपसरपंच एन. डी. शेवाळे, नानासो साळुंखे, संदीप धुळप, संत रोहिदास मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुळप, प्रदीप धुळप यांचा समावेश होता. तसेच शाळेचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या कार्यक्रमात धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीने विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या कार्याची माहिती मोहन पाटील आणि स्वाती शेवाळे यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या अखेरीस शंकर पाटील (आबा), प्रदीप धुळप आणि पत्रकार भिमराव धुळप यांनी घोगाव ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकीतून प्रेरणा घेत अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्याचा निर्धार मैत्री सहयोग फाउंडेशनने व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment