कोमसाप ठाणे शहर शाखेत पैशांचा अपहार ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल !!
** पदावर नसलेल्या व्यक्तींशी संपर्क साधून संस्थेची फसवणूक
ठाणे, प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद या नोंदणीकृत संस्थेच्या ठाणे शहर शाखेचे खाते असलेल्या ठाणे भारत सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून, एक वर्षापूर्वी नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आली असताना, कोमसाप ठाणे शहर अध्यक्ष मनोज वैद्य यांच्या नकळत जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी पदावर नसलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून पन्नास हजार रुपये काढून घेतले. अजून एक चेक घेऊन, अजून पन्नास हजार काढण्यासाठी जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी तत्कालीन कोषाध्यक्ष साधन ठाकूर यांना तगादा लावला असता साधना ठाकूर यांना पहिली चूक लक्षात आली आणि त्यांनी ही घटना कोमसाप ठाणे शाखा अध्यक्ष मनोज वैद्य यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी संस्थेत अफरातफर केली असल्याचे समोर आले. तसेच अजूनही एक चेक गायब करण्यात आलेला आहे.
याबाबत कोमसाप ठाणे शहर विद्यमान अध्यक्ष मनोज वैद्य यांनी पोलीसात तक्रार दाखल केली असून, त्यांच्या शाखेतील आर्थिक अफरातफर संदर्भात गुन्हा दाखल करण्यास कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोमसापच्या तत्कालीन अध्यक्षा संगीता कुलकर्णी व सचिव राजेश दाभोळकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने, ठाणे शहर शाखेची नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या उपस्थितीत एकूण सोळा सदस्यांच्या मान्यतेने 3 जून 2022 रोजी मनोज वैद्य यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड गडकरी रंगायतन येथील सभेत करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पदाधिकारी अस्तित्वात आल्यानंतर, सुमारे एक वर्षाने दि.25 जुलै 2023 रोजी पदावर नसताना माजी सचिव राजेश दाभोळकर व माजी कोषाध्धक्ष साधना ठाकूर यांनी रुपये पन्नास हजार रोख ठाणे भारत सहकारी बॅंकेच्या मुख्य शाखेतील खात्यातून काढून, कोमसाप जिल्हाअध्यक्ष बाळ कांदळकर यांच्याकडे सोपविले.
माजी पदाधिकारी राजेश दाभोळकर व साधना ठाकूर यांनी हे आर्थिक गुन्हेगारी कृत्य जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या दबावात येऊन केले असे सांगितले. तसेच हा शहर शाखेचा पन्नास हजारांचा निधी जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी आपल्या खिशात घालून, ठाणे शहर शाखेला आजतागायत कोणताही हिशोब दिलेला नाही.
शाखेच्या या बँक खात्याचे लेखा परीक्षण करायचे असल्याने, नवीन पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे अधिकार प्रलंबित ठेवले होते. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, पैशाची अफरातफर केली असल्याची लेखी तक्रार शाखा अध्यक्ष मनोज वैद्य यांनी केंद्रीय पदाधिकाऱयांना दिली होती.
आता विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपत येत असल्याने, कोमसाप ठाणे शाखेच्या बँक खात्यातील आर्थिक अपहाराचा कायदेशीर मार्गाने सोक्षमोक्ष लावणे अपरिहार्य असल्याचे शाखा अध्यक्ष मनोज यांनी निर्णय घेतला. त्यानुसार पोलीस तक्रार करण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे विद्यमान शाखा अध्यक्ष मनोज वैद्य यांनी स्पष्ट केले.
कोमसापच्या या भ्रष्ट ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांच्यावर केंद्रीय अध्यक्षांनी तातडीने कारवाई करून, त्यांना सर्व पदावरून हटवून, संस्था स्तरावरसुद्धा या आर्थिक गुन्हा प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी कोमसाप ठाणे शाखा अध्यक्ष मनोज वैद्य यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment