बिपीसीएल कंपनी प्रशासनाचा मुजोरपणा !!
** स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस.
**'अनधिकृतपणे परप्रांतीय कामगारांना कंपनीत काम करण्यासाठी प्रवेश दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण
बिपीसीएल कंपनीच्या गेट समोरच तीव्र आंदोलन करण्याचा स्थानिक माथाडी कामगारांचा निर्धार....
**मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार**
बिपीसीएल कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे.
पैसे घेऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना कंपनीत काम लावत असल्याचा स्थानिक माथाडी कामगारांचा आरोप.
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनी, प्रकल्प मोठ्या प्रमाणात कार्यरत असून या कंपनी, प्रकल्प मधून कोट्यावधीची उलाढाल होत आहे मात्र उरणमध्ये स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता बाहेरून आलेल्या परप्रांतीय कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती अनेक कंपन्या व प्रकल्पात सुरू असल्याने स्थानिक असलेल्या बेरोजगारांचा, कामगारांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरण तालुक्यात भेंडखळ येथे बीपीसीएल (भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड) हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे सदर प्रकल्प राष्ट्रीय असल्याने व उरण तालुक्यात भेंडखळ येथे असल्यामुळे सदर कंपनीने नोकरी मध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते. मात्र सदर कंपनीला सध्या स्थानिक असलेल्या बेरोजगारांचा व कामगारांचा विसर पडला असून दिनांक १५ ऑगस्ट २०२५ व १६ ऑगस्ट २०२५ या दिवशी बीपीसीएलच्या कंपनी प्रशासनाने स्थानिक असलेल्या माथाडी कामगारांना सणा निमित्त सुट्टी दिली व याच सुट्टीच्या काळात परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिला. मात्र सुट्टीच्या दिवशी स्थानिक कामगार काम करण्यास तयार होते पण स्थानिक माथाडी कामगारांना विश्वासात न घेता, त्यांना न कळवता सुट्टीच्या दिवशी परप्रांतीय कामगारांना रोजगार दिल्याने स्थानिक माथाडी कामगारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.असाच प्रकार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सुद्धा झाला आहे. बीपीसीएल प्रशासन नेहमी स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या बीपीसीएलच्या अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएल कंपनीत काम करणारे स्थानिक माथाडी कामगार असलेले टोळी क्रमांक २०४८ व टोळी क्रमांक ३०६८ च्या माथाडी कामगारांनी शनिवार दिनांक १६/८/२०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता बीपीसीएलच्या गेटवरच बिपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. टोळी नंबर ३०६८ चे माथाडी कामगार नवीन अखिल भारतीय माथाडी वाहतूक आणि जनरल कामगार संघटना या कामगार संघटनेशी संलग्न आहे तर टोळी नंबर २०४८ चे माथाडी कामगार हे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनशी सलंग्न आहेत. दोन्ही टोळीचे स्थानिक माथाडी कामगार असलेले ९६ कामगारांनी यावेळी एकत्र येत बीपीसीएलच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराचा निषेध केला.
यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक माथाडी कामगारांनी सदर कंपनीच्या अधिकारी वर्गावर मराठी माणसांचा अपमान करत असल्याचा व पैसे खाऊन परप्रांतीय कामगारांना कामे देत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी कामगारांनी विविध कंपनीचे अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. या समस्या संदर्भात व स्थानिक माथाडी कामगारांच्या मागणी संदर्भात बिपीसीएल कंपनीचे अधिकारी अरविंद चक्रवर्ती यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही कोणावरही अन्याय केला नाही. आम्ही नियमानुसार काम करीत आहोत. आमचा स्थानिक कामगारांना विरोध नाही. मी मराठी माणसाचा अपमान केला नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप कामगारांनी अरविंद चक्रवर्ती यांच्यावर केला असता हा आरोप चुकीचा असल्याचे अरविंद चक्रवर्ती यांनी सांगितले. सदर समस्या संदर्भात ऍडमिन इन्चार्ज यांच्याशी भेट घेऊन संवाद साधला असता ऍडमिन इन्चार्ज सुधीर कांबळे यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. कंपनीचे मेंटेनन्स मॅनेजर नारायण लांडे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही मेंटेनन्स साठी आलेलो आहोत. आम्हाला इतर गोष्टीची माहिती नाही असे मेंटेनन्स मॅनेजर नारायण लांडे यांनी सांगितले. कंपनीचे टर्मिनल मॅनेजर अरुण रेड्डी हे सुट्टीवर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सेक्युरिटी इन्चार्ज व्यांकाप्पा हावकोंडी यांना स्थानिक माथाडी कामगारांनी सर्वच परप्रांतीय कामगारांची ओळखपत्र, प्रवेशपत्र, माथाडी कामगार असलेले ओळखपत्र व इतर कागदपत्रे मागितली असता ते देण्यास सेक्युरिटी इन्चार्ज व्यांकाप्पा हावकोंडी यांनी नकार दिला. त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते. परप्रांतीय कामगार हे अनधिकृत पणे, बेकायदेशीर पणे कंपनीत काम करीत असल्याचा आरोप स्थानिक माथाडी कामगारांनी केला आहे. परप्रांतीय कामगार हे अधिकृत माथाडी कामगार नाहीत तसेच त्यांना सदर कंपनीत काम करण्याचा कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे,अनधिकृतपणे कामावर घेतलेच कसे जाते ? बिपीसीएल सारख्या राष्ट्रीय महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात परप्रांतीयांना प्रवेश मिळतोच कसा ? सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रासानायनिक द्रव्य पदार्थ बनत असलेल्या बिपीसीएल कंपनीत अप्रशिक्षित, विना अनुभवी परप्रांतीय कामगारांमुळे एखादी अनुचित किंवा वाईट घटना घडल्यास, अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? एखादी दुर्घटना होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल स्थानिक माथाडी कामगारांनी उपस्थित केला आहे. २००३ पासुन जे कामगार गुड्स ट्रान्सपोर्ट लेबर बोर्ड माथाडी कामगार रजिस्ट्रेशन आहेत तेच कामगार राहतील. त्याच कामगारांना बिपीसीएल कंपनीत काम मिळाले पाहिजे अशी स्थानिक माथाडी कामगारांची प्रमुख मागणी असून माथाडी कामगारांना सुट्टीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी रोजगारात, नोकरीत प्राधान्य दिले नाही तर बिपीसीएल कंपनीच्या गेट समोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी बिपीसीएल कंपनी प्रशासनाला दिला आहे.
No comments:
Post a Comment